दुबईत ४ व ५ फेब्रुवारीला दुसरे आंतरराष्ट्रीय योग संमेलन, योगासन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 09:33 PM2022-11-21T21:33:39+5:302022-11-21T21:34:25+5:30
Nagpur News श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती व बृहन्महाराष्ट्र योग परिषदेतर्फे ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी दुबईत दुसरे आंतरराष्ट्रीय योग संमेलन व योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
नागपूर : योगाच्या माध्यमातून मानसिक व सामाजिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती व बृहन्महाराष्ट्र योग परिषदेतर्फे ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी दुबईत दुसरे आंतरराष्ट्रीय योग संमेलन व योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण खोडस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संमेलनाचे आयोजन श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य, कोषाध्यक्ष डॉ. सुरेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. संमेलनात योग कार्यशाळा, व्याख्याने, परिसंवाद, योगोपचार, शोधनिबंध वाचन होणार आहे. याशिवाय १० ते ६० वर्षे वयोगटातील मुले, मुली, प्रौढ स्त्री-पुरुषांच्या योगासन स्पर्धा होणार आहेत. सोबतच मल्लखांबाचे प्रात्यक्षिक, भारतीय नृत्यांचे सादरीकरण होईल. योगशास्त्राचा उपयोग शिक्षण, क्रीडा, आरोग्य क्षेत्रात कसा होऊ शकतो यावर संमेलनात प्रकाश टाकण्यात येणार आहे. संमेलनात बीज भाषण लोणावळा येथील योग संस्थेचे प्रमुख डॉ. मनमत मनोहर घरोटे यांचे होणार आहे. श्रीलंकेतील प्राध्यापिका इंडिका उर्फ निरांजना देवी यांचेही व्याख्यान होणार आहे. संमेलनात डॉ. अरुण खोडस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३ फेब्रुवारीपर्यंत प्राणायाम व ध्यान कार्यशाळा होईल. संमेलनासाठी नोंदणी सुरू असून इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. अरुण खोडस्कर यांनी केले. पत्रकार परिषदेला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. राजीव देशपांडे, योग जिल्हा शाखा नागपूरचे अनिल मोहगावकर, बृहन्महाराष्ट्र योग परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश मासुरकर उपस्थित होते.