औषधांवर ३ कोटी तर विजेवर ४ कोटींचा खर्च
By सुमेध वाघमार | Updated: April 26, 2024 18:49 IST2024-04-26T18:47:48+5:302024-04-26T18:49:19+5:30
मेयोतील वास्तव : सौर उर्जेतून उजळणार एक-एक इमारत

3 crores on medicines and 4 crores on electricity
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) वर्षाला औषधी, सर्जिकलसह इतरही साहित्यांवर ३ कोटींवर खर्च होत असताना त्यापेक्षा अधिक, ४ कोटी १० लाख रुपये विजेवर खर्च होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याची दखल घेत अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी यावर सौर उर्ज़ेचा पर्याय निवडला. पहिल्या टप्प्यात दोन इमारतीवर २०० किलोव्हॅट क्षमतेचे सौर पॅनल कार्यान्वित करण्याचे कार्य हाती घेतले. परिणामी, मे महिन्यापासून १ कोटी रुपयांची कपात करणे शक्य होणार आहे.
गरीब रुग्णांसाठी आशेचे किरण ठरलेल्या मेयोलाही वीजबिलाचे चटके सहन करावे लागत आहे. दरमहा जवळपास ३५ लाख रुपये विजेवर खर्च होत आहे. एकीकडे नवे बांधकाम, नवे विभाग व नवे यंत्र उपलब्ध होत असल्याने विजेच्या मागणी वाढली. त्यावरील खर्च वाढून ४ कोटी १० लाखांवर गेला. औषधांंवरील खर्चांपेक्षा विजेवरील खर्च मोठा आहे. परंतु आतापर्यंत याकडे कोणीच लक्ष दिले नाही. डॉ. चव्हाण यांच्याकडे अधिष्ठातापदाची सुत्रे येताच त्यांनी विजेवरील खर्च कमी करण्यासाठी पुढाकार घेतला. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (मेडा) सहकार्याने मेयोधमील बहुउद्देशिय इमारतीवर व न्यू गर्ल्स हॉस्टेलवरही सोलर प्लांट उभे करण्याला सुरुवात झाली. मे महिन्यात हा प्लांट पूर्ण झाल्यास जवळपास वर्षाला विजेचवरील खर्चात १ कोटींची बचत होणार आहे.
-आणखी पाच ठिकाणी सौर पॅनल
मेयो प्रशासन पुढील टप्प्यात सर्जिकल कॉम्प्लेक्स, नव्याने प्रस्तावित २०० बेड क्षमतेचे अतिदक्षता युनिट, विस्तारित बाह्यरुग्ण विभागाची इमारत, मुलांचे वसतीगृह, नव्याने उभारलेली प्रशासकीय इमारत या पाच ठिकाणी सौर उर्जा पॅनलची उभारणी करणार आहे. मेडाच्या मदतीने हे अपारंपारिक उर्जा स्त्रोत उभारले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच सौर उर्जेतून एक-एक इमारत उजळून निघणार आहे.
-बचत होणाºया निधीतून औषधींची खरेदी
वर्षाला विजेवर ४ कोटी १० लाखांवर जात असल्याने सौर उर्जेचा पर्याय निवडला. मेयोतील एक-एक इमारतीवर ‘मेडा’ सहकार्याने सौर पॅनल उभे केले जातील. पहिल्या टप्प्यात बहुउद्देशिय इमारतीवर व न्यू गर्ल्स हॉस्टेलवरही सोलर उभे केले जात आहेत. त्यामुळे विजेवरील खर्चातून जवळपास १ कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे. या निधीतून औषधांची खरेदी करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
-डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता मेयो