पेटलेल्या मराठा आंदोलनात 'लालपरी' ठरली 'सॉफ्ट टार्गेट'; ८५ गाड्या फोडल्या, ३ बसेस पेटविल्या
By नरेश डोंगरे | Published: October 30, 2023 10:12 PM2023-10-30T22:12:30+5:302023-10-30T22:12:40+5:30
विविध भागातील मार्गावर लागला ब्रेक : लाखोंचे नुकसान
नागपूर : राज्यातील अनेक भागात पेटलेल्या मराठा आंदोलनाची तीव्र झळ राज्य परिवहन महामंडळाला बसली आहे. चार दिवसांत राज्यात ३ एसटी बसेस जाळण्यात आल्या असून ८५ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. जाळपोळ, तोडफोडीतून होणारे प्रचंड नुकसान आणि आंदोलनाचा जागोजागी ब्रेकर (अडथळा) लागल्याने एसटी महामंडळाला रोज लाखोंचा फटका बसत आहे. परिणामी एसटी महामंडळांत तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी यासाठी आंदोलक आक्रमक झाल्याने मराठा आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत आहे. परिणामी राज्याच्या विविध भागात रास्ता रोको, तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. कुण्या एखाद-दुसऱ्या गावाकडे नव्हे तर राज्याच्या अनेक भागात हे लोण पसरले असून आंदोलकांसाठी एसटी महामंडळाची 'लालपरी सॉफ्ट टार्गेट' ठरली आहे. विविध पक्षाच्या नेत्यांसोबतच आंदोलक त्यांचा राग 'वड्याचे तेल वांग्यावर' या उक्तीप्रमाणे एसटीच्या लालपरीवर काढत आहेत.
केवळ चार दिवसांत राज्यात ३ बसेस पेटविण्यात आल्या असून ८५ गाड्या फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामंडळाला चांगलीच धडकी भरली आहे. एकीकडे जाळपोळ तोडफोडीमुळे प्रचंड नुकसान होत आहे. तर, दुसरीकडे आंदोलनाचा अडथळा पार करता येत नसल्याने विविध मार्गाने धावणाऱ्या अनेक गाड्या जागच्या जागी अडून पडल्या आहेत. परिणामी ठिकठिकाणच्या फेऱ्यांवर विपरीत परिणाम होऊन एसटीला रोज लाखोंच्या उत्पन्नापासून मुकावे लागत आहे.
विदर्भातील वऱ्हाडात कोंडी;
नागपूर-विदर्भात आंदोलनामुळे वऱ्हाडाकडील भाग एसटीची कोंडी करणारा ठरला आहे. यवतमाळ मार्गे धावणाऱ्या पंढरपूर - नागपूर, सोलापूर - नागपूर आणि परतीच्या मार्गावरील बसेसपैकी काही बसेस पुसद, उमरखेड, अंबेजोगाई आदी ठिकाणी अडून उभ्या आहेत. तर, अमरावती मार्गे धावणाऱ्या नागपूर ते पूणे चिखलीपर्यंत आणि नागपूर ते छत्रपती संभाजीनगर ही बसअकोल्यापर्यंतचा प्रवास करून अडकून पडली आहे.
७७०९ किलोमिटरच्या २२ फेऱ्या प्रभावित
अधिकाऱ्यांच्या मते विदर्भातील ७७०९ किलोमिटरच्या मार्गावर धावणाऱ्या २२ फेऱ्यांना आंदोलनाचा जबर फटका बसला आहे. बसेसचे संचालन बंद पडल्याने एसटीला रोज लाखोंचा फटका बसत आहे.
आर्थिक कोंडीची भीती
हे आंदोलन आणखी किती दिवस चालेल, याचा नेम नाही. मात्र, अशीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास एसटी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही चांगलीच धडकी भरली आहे.