कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजारांची मदत; कृषिमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 09:33 PM2017-12-22T21:33:30+5:302017-12-22T21:34:05+5:30

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत दिली जाईल. सोबतच धानाला हेक्टरी ७ हजार ९७० रुपये ते १४ हजार ६७० रुपये मदत दिली जाईल अशी घोषणा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी विधानसभेत केली.

30 to 37 thousands for cotton; Agriculture minister | कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजारांची मदत; कृषिमंत्र्यांची घोषणा

कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजारांची मदत; कृषिमंत्र्यांची घोषणा

Next
ठळक मुद्देधानाला प्रती क्विंटल २०० रुपये बोनस 

आॅनलाईन लोकमत
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोंडअळीमुळे झालेले कापसाचे नुकसान, दुष्काळामुळे झालेले धान, फळपीक व भाजीपाल्याचे नुकसान चांगलेच गाजले. शेवटी जाता जाता सरकारने या चारही पिकांसाठी मदत जाहीर केली. बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत दिली जाईल. सोबतच धानाला हेक्टरी ७ हजार ९७० रुपये ते १४ हजार ६७० रुपये मदत दिली जाईल. ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राहील. याशिवाय धानाला प्रति क्विंटल २०० रुपये बोनस दिला जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी विधानसभेत केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे राजकीय भांडवल करण्याची कुठलीही संधी विरोधकांना मिळू नये म्हणून सत्ताधाऱ्यांनीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. यावरील चर्चेदरम्यान मात्र, विरोधकांनी सरकारच्या कृषी धोरणांवर टीका करीत भरीव मदतीची मागणी लावून धरली होती. शेवटी अधिवेशनाचे सूप वाजताना शेतकऱ्यांच्या पदरात मदतीची घोषणा पडली. कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले की, कापसाला दिली जाणारी मदत ही एनडीआरफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक), पीक विमा योजना व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत मिळणारी मदत, असे तिन्ही एकत्रित करून दिली जाईल. कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्याला प्रती हेक्टरी एनडीआरफमधून ६ हजार ८०० रुपये, पीक विमा अंतर्गत ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत १६ हजार रुपये असे एकूण ३० हजार ८०० रुपये मिळतील. बागायती कापूस उत्पादकाला प्रती हेक्टरी एनडीआरफमधून १३ हजार ५०० रुपये, पीक विमा अंतर्गत ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत १६ हजार रुपये असे एकूण ३७ हजार ५०० रुपये मिळतील.
कोरडवाहू धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी एनडीआरफमधून ६८०० रुपये व पीक विमा अंतर्गत ११७० रुपये असे एकूण ७ हजार ९७० रुपये मिळतील. ओलिताच्या धान उत्पादकांना प्रती हेक्टरी एनडीआरफमधून १३ हजार ५०० रुपये, पीक विमा अंतर्गत ११७० रुपये असे एकूण १४ हजार ६७० रुपये मिळतील. याशिवाय धानाला प्रति क्विंटल २०० रुपये बोनस दिला जाईल व ही मर्यादा ५० क्विंटलपर्यंत असेल, असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. फ़ळपीकांसाठी एनडीआरफमधून १८ हजार रुपये व पीक विमा अंतर्गत ९ ते २५ हजार रुपयांची मदत मिळेल. भाजीपाला उत्पादकांना हेक्टरी १३ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे.

अशी मिळणार मदत              (हेक्टरी)
पीक                           कोरडवाहू                        बागायती
कापूस                          ३०८००                           ३७५००
धान                            ७९७०                              १४६७०
फळपीक                      २७०००                            ४३०००
भाजीपाला                   १३,५०० (सर्व प्रकारचा)
--------------------------------
टीप : मदत दोन हेक्टरपर्यंतच मिळेल

 

Web Title: 30 to 37 thousands for cotton; Agriculture minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.