जि.प. पेन्शन घोटाळ्यात ३० बोगस खाती उघडकीस; रक्कम तीन कोटींच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 01:07 PM2023-01-21T13:07:25+5:302023-01-21T13:10:51+5:30
२४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले जाणार
नागपूर : जिल्हा परिषदेच्या पारशिवनी पंचायत समितीतील पेन्शन घोटाळा प्रकरणात आतापर्यंत ३० बोगस खाती समोर आली आहेत. आधी या प्रकरणात १७ बोगस खाती पुढे आली होती. यामुळे घोटाळ्यातील रक्कम तीन कोटींच्या घरात गेली आहे.
या घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून २४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले जाणार असल्याची माहिती आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच घोटाळ्यातील मुख्य आरोपी सरिता नेवारेसह लेखाधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत आणखी काही आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी सरिता नेवारे हिच्याकडून सोन्याचे दागिने, फर्निचर, ट्रक, स्कार्पिओ व फर्निचर जप्त केले आहे. हा मुद्देमाल ६० ते ७० लाखांच्या घरात आहे. इमारत जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या इमारतीची किंमत बाजारभावानुसार ६० लाखांच्या घरात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय, नेवारे हिने मुलीच्या खात्यावर वर्ग केलेली दोन लाख ३० हजार रुपयांची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. कायदेशीर कारवाई पूर्ण केल्यानंतर इमारत जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
या चौकशीत तत्कालीन सहा गटविकास अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह गटशिक्षणाधिकारी व कर्मचाऱ्यांनाही पोलिसांकडून जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी १३ ही तालुक्यांतील पेन्शन वाटपासंदर्भात लोकल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे ऑडिटचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे.