३० कोटींच्या उलाढालीचा गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 01:39 AM2017-08-25T01:39:46+5:302017-08-25T01:41:06+5:30

महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पाचे शुक्रवारी घरोघरी आगमन होणार आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत श्रीच्या मूर्ती, पूजेच्या साहित्यापासून सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीला उधाण आले आहे.

30 crore turnover of Ganesh Festival | ३० कोटींच्या उलाढालीचा गणेशोत्सव

३० कोटींच्या उलाढालीचा गणेशोत्सव

Next
ठळक मुद्देसर्वच बाजारपेठांमध्ये उत्साह : आज आगमन, महागाईचा परिणाम नाही, आकर्षक देखाव्यांनी रंगणार गणेशोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पाचे शुक्रवारी घरोघरी आगमन होणार आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत श्रीच्या मूर्ती, पूजेच्या साहित्यापासून सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीला उधाण आले आहे. बाजारपेठा विविधांगी देखाव्याच्या मखरांनी, फुलमाळांनी, तोरणांनी सजलेल्या आहेत. गुरुवारी सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून आली. यावर्षी गणेशोत्सवात सर्वच बाजारपेठांमध्ये एकूण ३० कोटींची उलाढाल होणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

बाजारपेठेत सर्वत्र गर्दी
गणेशोत्सवात सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत आहे. शहरात जागोजागी सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप सजले आहेत. मुख्य बाजारपेठ चितारओळीत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलवर श्रींच्या मूर्ती विकल्या जात होत्या. अनेक जण घरी सजावटीसाठी साहित्य खरेदी करतानाही दिसून आले. साहित्य विक्रेत्यांनी सांगितले की, मागील दोन दिवसात आमच्याकडील ७० टक्के सजावटीच्या साहित्यांची विक्री झाली. सर्वाधिक उलाढाल तीन ते चार दिवसात होते. यावर्षी महागाईचा उत्सवावर काही परिणाम झालेला नाही. भाविक मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्याचे बाजारात फेरफटका मारला असता दिसून आले.

इको फे्रंडली सजावटीकडे लक्ष
घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी महाग वस्तूंच्या खरेदीकडे कानाडोळा करीत इको फ्रेंडली सजावटीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी लाकूड, बांबू, कापडी फुलांचा वापर करून मंडपाची सजावट करीत आहेत. यंदा कापडी आणि कागदी फुलांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. गणेश उत्सवात थर्माकॉलचा वापर कमी व्हावा, कमी खर्चात आकर्षक सजावट व्हावी, या उद्देशाने मंडळे कापडी फुलांचा जास्त वापर करीत आहेत. गणेश उत्सवात पर्यावरणाचे महत्त्व वाढावे, या हेतूने कृत्रिम रंगबिरंगी फुलांचा जास्त प्रमाणात वापर होत आहे.

चायना मेड सजावट साहित्याला दणका
भारत आणि चीनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात चिनी बनावटीच्या सजावट साहित्याच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे. समाजमाध्यमांमध्ये चीनविरोधात नेटीझन्स मंडळींकडून मोठी मोहीम राबवली जात आहे. त्याचे पडसाद बाजारपेठेत उमटत असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. विशेषत: यंदाच्या गणेशोत्सवात मोठ्या संख्येने आयात होणाºया चिनी मालाला खीळ बसली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्युत माळा, विद्युत झोत टाकणारे दिवे, फुलांच्या माळा, विद्युत सजावट साहित्य चीनमधून आयात होतात. अतिशय स्वस्तात मिळणाºया या वस्तूंमुळे गणेशोत्सव देशी असला तरी त्याची सजावट मात्र चिनी होती. या चित्राला यंदा काही अंशी फटका बसला आहे. ग्राहकांकडून भारतीय बनावटीच्या साहित्याची मागणी होत आहे. भारतीय सजावट साहित्य महाग असले तरी टिकाऊ असते. लोकांनाही ते पटू लागले आहे. काही संस्थांनी गणेशमूर्तीसाठी तयार सिंहासन विक्रीस उपलब्ध केले आहेत.

फुलांची बाजारपेठ पाच कोटींची
गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गुलाब, झेंडू, शेवंती आणि सजावटीच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. या फुलांची मागणी पाहता ११ दिवसांत नागपुरात जवळपास पाच कोटींच्या फुलांची उलाढाल होत असल्याचे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. पूजेची फुले नागपूर जिल्हा आणि लगतच्या २०० कि.मी. परिसरातून सीताबर्डी येथील घाऊक बाजारपेठेत विक्रीस येतात. सध्या भाविकांकडून मागणी वाढल्यामुळे फुलांच्या बाजारात तेजी आहे. झेंडू, पांढरी फुले आणि गुलाबाची फुले सर्वाधिक विकली जातात. झेंडूची फुले ५० ते ६० रुपये किलो, पांढरी फुले २०० ते ३०० रुपये किलो आणि गुलाब ३०० ते ५०० रुपये किलोप्रमाणे घाऊकमध्ये भाव आहेत. फुलांपासून तयार केलेले एरवी २० ते ५० रुपयांमध्ये मिळणारे हार १०० ते २०० रुपयांवर पोहोचले आहे. यातही विविध प्रकारचे गजरे व अन्य सजावटींच्या गुच्छांचेही भाव वाढले आहेत.

गणपती माझा नाचत आला...
श्री गणेश म्हणजे भाविकांचे लाडके आराध्य. विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या चैतन्यदायी, मंगलदायी आणि निसर्गप्रिय आनंदयात्रेला शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ होत आहे. शहरातील चितार ओळी हे गणेशमूर्ती मिळण्याचे मोठे ठिकाण. गुरुवारीच बाप्पाला घरी नेण्यासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीने हा परिसर फुलून गेला होता. सर्वत्र ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांचा आवाज, ‘गणपती बाप्पा मोरया..., एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार...’ अशा आरोळ्यांनी संपूर्ण परिसर प्रचंड उत्साहाने भरून गेला होता. जो तो बाप्पाला घरी घेऊन जाण्याच्या लगबगीत होता. या उत्साहाच्या वातावरणात जनमन भारावून गेले होते. वाद्यांच्या मिरवणुकीतून नाचत गाजत कुणाच्या मोटरसायकलवर, कुठे कारमध्ये, ट्रक टेम्पो, तर कुणाच्या सायकलवर स्वार होऊन गणराज सार्वजनिक मंडळांच्या मंडपात विराजमान झाले.

Web Title: 30 crore turnover of Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.