नागपूर जिल्ह्यातील पांदण रस्त्यांसाठी ३० कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 08:30 PM2019-06-14T20:30:47+5:302019-06-14T20:33:24+5:30

पांदण रस्ते व नाल्यांच्या बांधकामासह यावर वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत असून यासाठी उप विभागीय अधिकारी यांना नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहे. डिझेल व मशीनच्या भाड्यापोटी होणारा खर्च भागविण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी ५ कोटी असे एकूण ३० कोटी रुपयांचा निधी जिल्हा खनिज निधीमधून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. भौतिक पायाभूत सुविधा, जलसंपदा, ऊर्जा व पाणलोट क्षेत्रविकास तसेच पर्यावरण दर्जावाढ व उपाययोजना यासाठी लोकप्रतिनिधीकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावानुसार निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.

30 crores for pandan road in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील पांदण रस्त्यांसाठी ३० कोटी रुपये

जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या बैठकीत आवश्यक निर्देश देतांना ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. यावेळी उपस्थित आ. समीर मेघे, प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा खनिज अधिकारी मिलिंद बऱ्हाणपूरकर

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे विविध विकासासाठी १३८ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पांदण रस्ते व नाल्यांच्या बांधकामासह यावर वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत असून यासाठी उप विभागीय अधिकारी यांना नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहे. डिझेल व मशीनच्या भाड्यापोटी होणारा खर्च भागविण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी ५ कोटी असे एकूण ३० कोटी रुपयांचा निधी जिल्हा खनिज निधीमधून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. भौतिक पायाभूत सुविधा, जलसंपदा, ऊर्जा व पाणलोट क्षेत्रविकास तसेच पर्यावरण दर्जावाढ व उपाययोजना यासाठी लोकप्रतिनिधीकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावानुसार निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा खनिज प्रतिष्ठानची बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, स्वच्छता आदी क्षेत्रातील विकास कामांच्या १३८ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. यावेळी आ. समीर मेघे, प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा खनिज अधिकारी मिलिंद बºहाणपूरकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यातील उच्च प्राधान्य व अन्य प्राधान्य असलेल्या घटकांसाठी निधी उपलब्ध करुन १३८ कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्रस्तावाचा आढावा घेऊन विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे प्राधान्यक्रम असलेल्या योजनांसाठी १३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी १२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा निधी विधानसभा मतदारसंघनिहाय समप्रमाणात वितरित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासोबतच अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच महिला व बालक आरोग्याच्या सुविधेत वाढ करण्यासाठी डागा रुग्णालयाला १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
जिल्हा खनिज विकास निधीमधून विविध विभागांना यापूर्वी १९२ कोटी ४९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. विविध विभागांच्या कामाच्या प्रगतीनुसार ८४ कोटी रुपयांचा निधी विभाग प्रमुखांना उपलब्ध करून देण्यात आला असून ज्या विभागाने हा निधी अद्याप खर्च केला नाही, अशा विभाग प्रमुखांविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करावी, असे निर्देश बैठकीत पालकमंत्र्यांनी दिलेत. उपलब्ध निधी एक महिन्यात खर्च करावा अशा सूचनाही यावेळी सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आल्यात.
प्रारंभी प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे याआधी मंजूर केलेल्या १४८ कोटी रुपयांच्या प्रस्तावाची विभागनिहाय माहिती दिली. तसेच विविध विभागांना आतापर्यंत १९२ कोटी ४९ लक्ष रुपयांपैकी अहवाल सादर केलेल्या तसेच कामे पूर्ण झालेल्या विभागांना ८४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
स्वच्छतेसाठी १८ कोटी रुपयांची तरतूद
ग्रामीण भागात विधानसभा मतदारसंघनिहाय स्वच्छतेसाठी १८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असून गावांमध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टिम तयार करण्याचा प्रयत्न आहे.
सर्व अपंगांना बॅटरी ऑपरेटेड सायकल रिक्षा
अपंगांसाठी बॅटरी ऑपरेटेड सायकल रिक्षा तसेच इतर साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी यापूर्वी ४ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. जिल्ह्यात १ हजार २४० सायकल रिक्षांचे वाटप पूर्ण झाले असून इतर अपंगांसाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून दोन कोटी रुपये अतिरिक्त उपलब्ध करून देण्यात येत आहेत. खरबी येथे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला.
सर्व आरोग्य केंद्र, शाळा सौर ऊर्जेवर आणणार
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा तसेच अंगणवाडी व आरोग्य केंद्र सौर ऊर्जेवर आणण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यासाठी खनिज प्रतिष्ठानतर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येत असून यावर्षी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १ हजार ५४१ शाळांपैकी ३०८ शाळा सौर ऊर्जेवर आणण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून इतर सर्व शाळा व आरोग्य केंद्र यांच्यासाठी निधी प्राधान्याने देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
विधानसभानिहाय ग्रीन झोन
पर्यावरण संवर्धनासोबतच प्रत्येक तालुक्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून सरासरी पाच एकर क्षेत्रावर हरित क्षेत्र (ग्रीन झोन) निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या हरित क्षेत्राच्या निर्मितीसोबतच गुरांचा चारासुद्धा तयार करण्याच्या दृष्टीने विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी ३ कोटी प्रमाण १८ कोटी रुपयांच्या निधींच्या प्रस्तावास यावेळी मान्यता देण्यात आली. ग्रीन झोन तयार करताना मनरेगाच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या सदस्यांना नियमित रोजगार उपलब्ध होईल, याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
खनिज प्रतिष्ठानच्या सर्व कामांचे व्हिडीओ चित्रीकरण
खनिज प्रतिष्ठानच्या निधीमध्ये होणारी सर्व कामे अत्यंत पारदर्शक व्हावीत, यासाठी प्रत्येक कामाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिलेत. मागील वर्षी विविध विभागांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या विनियोगासंदर्भातही आढावा घेऊन कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, असे निर्देशही यावेळी देण्यात आलेत.

 

Web Title: 30 crores for pandan road in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.