राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या लढ्याला ३० दिवस; समान वेतन, समायोजनासाठी संघर्ष
By निशांत वानखेडे | Published: November 23, 2023 04:18 PM2023-11-23T16:18:10+5:302023-11-23T16:19:57+5:30
बुधवारी रक्तदान व गुरुवारी मेडिकलसमोर निषेध
नागपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत शहरी व ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणारे राज्यभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलन महिनाभरापासून सुरू आहे. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतन आणि सेवेत समायोजन ही मागणी असून या लढ्याला गुरुवारी ३० दिवस पूर्ण झाले. सरकारकडून सकारात्मक निर्णय होत नसल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
नागपूर जिल्हा व शहरातील एनएचएम कर्मचाऱ्यांचे संविधान चौकात महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. आरोग्य मिशनचे जिल्ह्यात १२०० च्यावर अधिकारी व कर्मचारी यात सहभागी आहेत. बुधवारी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करून सरकारचा निषेध करण्यात आला. यानंतर गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-मेडिकलासमोर धरणे प्रदर्शन करून रोष व्यक्त करण्यात आला.
नागपुरात कृती समितीचे समन्वयक प्रफुल्ल पोहाने, शेखर सोनटक्के, प्रवीण बोरकर, रत्ना कांबळे, चंदू मोरे, रोहित जैस्वाल यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असून या कंत्राटील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील रुग्णसेवा कोलमडली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत २००५ साली हे कर्मचारी कंत्राटी तत्वावर सेवेत रूजू झाले होते. गेल्या १८ वर्षापासून हे कर्मचारी अत्यल्प मानधनात सेवा देत आहेत. त्यांना शासकीय सेवेत समायोजित करण्याच्या व सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतन व सेवा योजना लागू करण्याची मागणी करीत १३ वर्षापासून त्यांचा संघर्ष सुरू आहे. ४० हजार कर्मचारी यात गुरफटलेले आहेत.
मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू असताना ३१ ऑक्टोबर रोजी राज्याचे आरोग्य मंत्री यांनी आरोग्य क्षेत्राच्या रिक्त जागांवर राष्ट्रीय अभियान कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याचे व मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्याचे आश्वासन दिले. मात्र २३ दिवस लोटूनही पुढे काहीच झाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संयुक्त समितीने आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे.