नागपुरात ‘स्वाइन फ्लू’मुळे ३० जणांचा मृत्यू; बाधितांचा आकडा ५८७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 02:48 PM2022-09-22T14:48:56+5:302022-09-22T14:49:28+5:30
स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची बैठक : सुरक्षात्मक काळजीचे आवाहन
नागपूर :नागपूर शहरात आतापर्यंत ५८७ स्वाईन फ्लू बाधितांची नोंद झालेली आहे. यामध्ये नागपूर शहरातील ३१४, नागपूर ग्रामीणमधील १०४, इतर जिल्ह्यातील १६९ अशा एकूण ५८७ रुग्णांचा समावेश आहे, तर ३० स्वाईन फ्लू संशयित रुग्णांच्या मृत्यू झाला.
मनपा स्थायी समिती सभागृहामध्ये बुधवारी आयोजित स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत शहरातील स्वाईन फ्लू बाधित आणि मृत्यूचे विश्लेषण करण्यात आले. स्वाईन फ्लूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, नागरिकांनी सुरक्षात्मक काळजी घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, शासकीय रुग्णालयांतील स्वाईन फ्लू तज्ज्ञ डॉ.गुंजन दलाल, डॉ.मिलिंद सूर्यवंशी, डॉ.राजरत्न वाघमारे, मनपाचे साथरोग अधिकारी डॉ.गोवर्धन नवखरे व खासगी रुग्णालयांमधील स्वाईन फ्लू तज्ज्ञ उपस्थित होते.
शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत दाखल संशयित स्वाईन फ्लू रुग्ण व बाधित, ३० स्वाईन फ्लू संशयित रुग्णांच्या मृत्यू विषयी माहिती देण्यात आली. मृत्यूचे विश्लेषण केले असता, २२ रुग्ण स्वाईन बाधित होते, तर इतर ८ जणांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात मनपा हद्दीतील ११ रुग्ण असून, ११ पैकी ५ रुग्णांचा स्वाईन फ्लूने तर उर्वरित ६ रुग्णांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे. ग्रामीणमधील तिनही मृत्युमुखी हे स्वाईन फ्लूबाधित असल्याचे स्पष्ट झाले. नागपूर व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातील ११ मृत्यू नागपुरात झाले. त्यापैकी १० मृत्यू हे स्वाईन फ्लूमुळे तर १ मृत्यू अन्य कारणामुळे झाले. इतर राज्यांतील दाखल रुग्णांपैकी ५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी ४ रुग्ण हे स्वाईन फ्लू बाधित होते.
स्वाईन फ्लू टाळण्याकरिता ही काळजी घ्या
- हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा
- गर्दीमध्ये जाणे टाळा
- स्वाईन फ्लू रुग्णापासून किमान ६ फूट दूर राहा
- खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा
- भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी
- पौष्टिक आहार घ्या
हे करू नका
- हस्तांदोलन अथवा आलिंगन
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे