राज्यभरात ३० टक्के वीज मीटर रीडिंग संशयास्पद; महावितरणच्या तपासात खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 10:44 AM2022-05-13T10:44:06+5:302022-05-13T10:48:07+5:30
महावितरणने राज्यभरात आतापर्यंत २,०२,३१२ मीटरची तपासणी केली. यापैकी ६०,३२६ (२९.८२ टक्के) रीडिंगमध्ये गडबड आढळून आली.
कमल शर्मा
नागपूर :वीज मीटरच्या रीडिंगबाबत नागरिकांच्या नेहमीच तक्रारी असतात. या तक्रारीत तथ्य असल्याची बाब उघडकीस आली आहे. राज्यभरात तब्बल २९.८२ टक्के वीज मीटर रीडिंग या संशयास्पद असल्याची बाब खुद्द महावितरणच्या तपासात दिसून आली आहे. विदर्भातही २७.३२ टक्के रीडिंगवर महावितरणनेच प्रश्न निर्माण केले आहे.
महावितरणच्या मीटर रिडिंगचे काम एजन्सींच्या माध्यमातून चालविले जाते. रीडिंगबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महावितरणचे प्रबंध निदेशक विजय सिंघल यांनी याची तपासणी सुरू केली. या अंतर्गत कुठल्याही रीडिंगची निवड करून त्याची तपासणी करण्यात आली. महावितरणने राज्यभरात आतापर्यंत २,०२,३१२ मीटरची तपासणी केली. यापैकी ६०,३२६ (२९.८२ टक्के) रीडिंगमध्ये गडबड आढळून आली. खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित फोटो काढले नाही. परिणामी ग्राहकांना अधिकच्या रीडिंगचे बिल देण्यात आले. काहींना कमी बिल मिळाले. महावितरणसह वीज ग्राहकांनाही याचा फटका बसला. आता सर्व मीटर रीडिंगची तपासणी करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
दहा कर्मचारी दररोज करतात तपासणी
या प्रकरणाला महावितरणने अतिशय गांभीर्याने घेतले आहे. रीडिंगच्या तपासणीसाठी मुख्यालयात १० कर्मचाऱ्यांची विशेष टीम नियुक्त करण्यात आली आहे. हे पथक दररोज रीडिंगची तपासणी करीत आहे. यासोबतच ६ मीटर रीडिंग एजन्सींना ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फीडरमध्ये तैनात एसडीओला मीटर रीडिंग एजन्सींसोबत समन्वय ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
मराठवाड्यात ६२ टक्के गडबड
राज्यात मीटर रीडिंगशी संबंधित सर्वाधिक समस्या मराठवाड्यात उघडकीस आल्या आहेत. महावितरणच्या औरंगाबाद विभागात ६१.९५ टक्के रीडिंगमध्ये गडबड आढळून आली आहे. येथे एकूण ३१,०८४ रीडिंगची तपासणी झाली. यापैकी १९,२५६ मध्ये गडबड आढळून आली. औरंगाबाद जिल्ह्यात ५६.९५ टक्के, लातूरमध्ये ५९.५० टक्के व नांदेडमध्ये ७०.०४ टक्के मीटर रीडिंगमध्ये गडबड सापडली. कोकण विभागात २६.१६ पुणे विभागात २९.८२ टक्के मीटर रीडिंग संशयास्पद आढळून आली.