३० लाखांच्या खंडणी प्रकरणाच्या सूत्रधाराला बेड्या; अटकेतील आरोपींची संख्या ५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 10:11 PM2022-02-17T22:11:02+5:302022-02-17T22:11:15+5:30
हवाला व्यावसायिकासह अनेकांची चाैकशी
नागपूर : वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायपालिकेतील वरिष्ठांच्या नावाने सुपारी व्यापाऱ्याकडून ३० लाखांची खंडणी उकळण्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला सौरभ खियालदास केसवानी याला अखेर नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. साैरभचे साथीदार हवाला व्यावसायिक नरेश परमार, रतन राणा, अशोक वंजानी तसेच संतोष मानधनिया या चाैघांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे.
परमार आणि राणा ईतवारी, गांधीबागमध्ये हवालाचा व्यवसाय करतात, तर संतोष चाळीसगाव (खान्देश) येथे हवाला चालवतो.
जळगावच्या सिंधी कॉलनीत राहणारा साैरभ केसवानी हा जळगाव शहरच नाही तर अवघ्या खानदेशात झोल पार्टी म्हणून ओळखला जातो. साैरभचे स्थानिक साथीदार, आरोपी मनोज वंजानी आणि अशोक वंजानी यांनी सुपारीच्या तस्करीत अटक केलेला व्यापारी अनुप महेशचंद्र नगरियाचे इंदोर (मध्य प्रदेश) निवासी मोठे बंधू अनिल यांना धाक दाखविला होता. “अनुपला कारागृहातून बाहेर काढायचे असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायपालिकेतील वरिष्ठांशी संधान साधावे लागेल. त्यासाठी ६० लाखांची खंडणी द्यावी लागेल’, असे म्हटले होते. जळगावमधील साैरभ केसवानी याचे वरिष्ठांशी संबंध असून तो हे काम करून देणार असल्याचीही थाप मारली होती.
भावाच्या प्रेमापोटी नगरिया यांनी ३० जानेवारीला आरोपी वंजानी बंधूंना ३० लाखांची खंडणी दिली होती. अनूपची सुटका झाल्यानंतर मात्र त्यांना शंका आल्याने त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाचाही यात गैरवापर झाल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरली. वंजानी बंधूला ताब्यात पलिसांनी घेतले. त्यानंतर पोलीस पथक चाळीसगाव, जळगाव, सूरतमध्ये पोहोचले. परमार, अशोक वंजानी, राणा आणि मानधनीयाला अटक करण्यात आली. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. आज मुख्य सूत्रधार साैरभ केसवानी उर्फ झोला पार्टीच्याही पोलिसांनी मुसक्या बांधल्या.
पोलीस कर्मचारीही सीसीटीव्हीत
कोणत्याही मोठ्या गुन्ह्यातील श्रीमंत आरोपीच्या नातेवाईकांशी संपर्क करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी सेटिंग करून देतो, अशी थाप मारणारे नागपुरात अनेक दलाल आहेत. बहुतांश दलाल हवाला, सुपारी तस्करी, बुकी, भूमाफिया तसेच गैरकाम करणाऱ्या मंडळींशी संबंधित आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात बसून त्यांच्या नावाने ते बेमालुमपणे ‘सुपारी’ घेतात. अनेक पोलीस कर्मचारीही त्यांच्यासाठी मुखबिर म्हणून काम करतात. या प्रकरणात दोन-तीनही बाजुने खबऱ्याची, मध्यस्थाची भूमीका वठविणारा एक पोलीस कर्मचारीही सीसीटीव्हीत आला आहे. त्याच्याशी संधान असलेले काही सेटरही अधोरेिखत झाले आहेत. ते स्वताची कातडी वाचविण्यासाठी भागमभाग करीत आहेत.
प्रचंड दडपण आल्याने झोला पार्टी सापडला
वरिष्ठाचे नाव घेतल्याने झोला पार्टीवर प्रचंड दडपण आले होते. त्यामुळे तो लपत छपत बुधवारी रात्री अमरावतीत पोहचला. नंतर नागपूर पोलिसांकडे त्याने शरणागती पत्करली. चाैकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या दिशानिर्देशात उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे.