३० लाख मंदिरे घडवू शकतात बदल, मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम स्वीकारावा - हावरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 07:59 AM2022-10-23T07:59:52+5:302022-10-23T08:00:18+5:30

‘एमबीए इन टेंपल मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू झाल्यास या क्षेत्रात सुजाण पिढी निर्माण होईल. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासोबत मंदिरांच्या संपत्तीचा समाजासाठी योग्य वापर होईल आणि देशात क्रांतिकारी बदल घडेल, असेही ते म्हणाले.

30 Lakh Temples Can Make a Change, Adopt Temple Management Course - Dr Suresh Haware | ३० लाख मंदिरे घडवू शकतात बदल, मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम स्वीकारावा - हावरे

३० लाख मंदिरे घडवू शकतात बदल, मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम स्वीकारावा - हावरे

Next

- गोपालकृष्ण मांडवकर

नागपूर : देशभरात मंदिरांची संख्या थोडीथोडकी नव्हे तर ३० लाखांवर आहे. लहान-मोठी मंदिरे मिळून ती एक कोटीपर्यंत जाईल. मंदिरांना येणारी रोजची देणगी कोटींच्या घरात आहे. मंदिरे ही श्रद्धास्थाने असली तरी अपवाद वगळता एकसूत्रपणा, योग्य व्यवस्थापनाचा अभाव असल्याने मंदिरे आणि त्यांच्या संपत्तीचा पुरेसा वापर समाजाच्या प्रगतीसाठी म्हणावा तसा होत नाही. यासाठी विद्यापीठांनी टेंपल मॅनेजमेंट अभ्यासक्रम स्वीकारावा. त्यातून घडलेली नवी पिढी या कार्यात उतरली तर हीच ३० लाख मंदिरे देशात क्रांतिकारी बदल घडवू शकतील, असा विश्वास श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे माजी अध्यक्ष तथा अणुशास्त्रतज्ज्ञ डाॅ. सुरेश हावरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.

श्री साईबाबा संस्थान येथे चार वर्षे अध्यक्षपदावर काम करताना आलेल्या अनुभवावरून मंदिर व्यवस्थापन हा फार मोठा विषय असल्याची जाणीव झाल्याचे सांगून डॉ. हावरे म्हणाले, बिझिनेस मॅनेजमेंटमधील मॅनपॉवर, मशिनरी, मनी, मटेरिअल आणि मार्केटिंग ही पाचही तत्त्वे ‘टेंपल मॅनेजमेंट’मध्येही लागू होतात. या क्षेत्राचा आजवर कुणी अभ्यासच केला नव्हता. त्यातून ‘टेंपल मॅनेजमेंट’ हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाल्याचे ते म्हणाले.

हा अभ्यासक्रम देशातील विद्यापीठांनी स्वीकारावा, यासाठी अलीकडेच नागपूरसह अमरावती, पुणे तसेच विद्यालंकार विद्यापीठ, मुंबई येथील कुलगुरूंशी चर्चा केली. ‘एमबीए इन टेंपल मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू झाल्यास या क्षेत्रात सुजाण पिढी निर्माण होईल. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासोबत मंदिरांच्या संपत्तीचा समाजासाठी योग्य वापर होईल आणि देशात क्रांतिकारी बदल घडेल, असेही ते म्हणाले.

‘टेंपल टुरिझम’ दुर्लक्षित
डॉ. सुरेश हावरे म्हणाले, देशात अनेक सुंदर व ऐतिहासिक मंदिरे आहेत. ती देशाची संस्कृती सांगतात. विदेशात मंदिरांचे ऑडिओ गॅझेट असल्याचे आपण पाहिले आहे. त्यातून मंदिरे, मूर्तींचा इतिहास कळतो. मात्र, पर्यटकांपर्यंत पोहाेचण्यासाठी आपल्याकडे या तंत्राचा अभाव आहे. या अभ्यासक्रमातून बराच वाव आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा मंदिरेच जपू शकतात. 

सेवाभिमुख कार्य
मंदिरांचा चेहरा सेवाभिमुख आणि समाजाभिमुख व्हावा. अन्नदान, शाळा-महाविद्यालये, आरोग्यसेवा, क्षेत्रीय गरजेनुसार सामाजिक उपक्रम चालतात. असे उपक्रम सर्वच मंदिरांमधून चालविण्यासाठी उत्तम व्यवस्थापनाची गरज आहे. ती अभ्यासक्रमातूनच पूर्ण होऊ शकते. मंदिरात येणारे स्वेच्छेने आणि भक्तिभावाने येतात. त्यांच्या भावनांचे बाजारीकरण न करता श्रद्धा व भावनेचा आदर व्हावा. मंदिरांचा योग्य वापर झाला तर दानपेटी हवी कशाला, असे विचारणाऱ्यांना उत्तर मिळेल, असेही डॉ. हावरे म्हणाले.

Web Title: 30 Lakh Temples Can Make a Change, Adopt Temple Management Course - Dr Suresh Haware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर