नागपुरात ३० लाखांचे कोकेन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:29 AM2018-05-15T00:29:29+5:302018-05-15T00:29:40+5:30
आफ्रिकेतून सौंदर्य प्रसाधनाच्या बॉक्समधून कोकेन पाठवून त्याची नागपूरमार्गे गोवा आणि इतर प्रांतात तस्करी करणाऱ्या रॅकेटचा मुंबईतील नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबईने सिनेस्टाईल छडा लावला. याप्रकरणी नागपुरातील एक महिला आणि गोव्यात राहणाऱ्या तिच्या मुलीला एनसीबी मुंबईच्या पथकाने अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आफ्रिकेतून सौंदर्य प्रसाधनाच्या बॉक्समधून कोकेन पाठवून त्याची नागपूरमार्गे गोवा आणि इतर प्रांतात तस्करी करणाऱ्या रॅकेटचा मुंबईतील नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबईने सिनेस्टाईल छडा लावला. याप्रकरणी नागपुरातील एक महिला आणि गोव्यात राहणाऱ्या तिच्या मुलीला एनसीबी मुंबईच्या पथकाने अटक केली. कल्पना रामटेके व तिची मुलगी टिना अशी अटकेतील आरोपी महिलांची नावे आहेत.
अमली पदार्थाच्या तस्करीसाठी नायजेरियन आणि आफ्रिकन कुपरिचित आहेत. काही महिन्यांपासून आफ्रिकन देशातून नागपुरातील एका महिलेच्या नावे नियमित सौंदर्यप्रसाधन (मेकअप) बॉक्स येत असल्याचे आणि ही महिला काही दिवसानंतर ते बॉक्स गोव्याला पाठवत असल्याचे एनसीबीच्या लक्षात आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे एनसीबीने नागपूर टपाल खात्यावर नजर रोखली. येथील जीपीओच्या अधिकाºयांना विशिष्ट सूचना देण्यात आली. गेल्या आठवड्यात आफ्रिकेतून एक पार्सल कल्पना रामटेके (रा. मिशन मोहल्ला, इंदोरा) हिच्या नावे आल्यामुळे एनसीबी सक्रिय झाली. पथकातील अधिकाºयांनी ७ मे रोजी नागपूर गाठून जीपीओच्या अधिकाºयांना काही सूचना केल्या. त्यानुसार, पोस्टमनने रामटेकेशी संपर्क करून तिला पार्सल सोडविण्यासाठी आधार कार्ड घेऊन जीपीओत बोलविले. त्यानुसार, कल्पना रामटेके तिची दुचाकी घेऊन जीपीओत आली. तिने ते पार्सल ताब्यात घेऊन आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. ती बाहेर निघताच एनसीबीच्या अधिकाºयांनी तिला ताब्यात घेतले. प्राथमिक विचारपूस केल्यानंतर पंचासमक्ष पार्सलचा बॉक्स उघडला असता त्यात सौंदर्यप्रसाधनाच्या आड ३५४ ग्राम कोकेन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत ३० लाखांपेक्षा जास्त आहे. एनसीबीच्या पथकाने जरीपटका ठाण्यात या प्रकाराची नोंद केल्यानंतर कल्पना रामटेकेच्या घराची झडती घेतली. त्यानंतर कल्पनाला अटक करून मुंबईला नेले. तिने दिलेल्या माहितीवरून नंतर या पथकाने गोवा येथे छापा घालून कल्पनाची मुलगी टिना हिलाही अटक केली.
मुख्य तस्कर फरार
मायलेकीला कोकेन तस्करीच्या आरोपात एनसीबीच्या कोठडीत पाठविणारा मुख्य आरोपी एक नायजेरियन आहे. तो गोव्यात राहतो. टिनाने त्याच्यासोबत सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. तेव्हापासून ती त्याच्यासोबतच गोव्यात राहते. हा नायजेरियन तस्कर गोव्यातून वारंवार आफ्रिकेत जायचा आणि तेथून तो सौंदर्य प्रसाधनांचा बॉक्स त्याची सासू कल्पनाला टपालाने पाठवायचा. हे टपाल ताब्यात घेतल्यानंतर कल्पना काही दिवसानंतर ते टिनाच्या नावाने गोव्याला पाठवत होती. यात कोकेन आहे की अन्य काही याची कल्पनाला कल्पना होती की नाही, ते स्पष्ट झाले नाही. तिने यापूर्वी अशा प्रकारे तीन चार वेळा टिनाला कोकेनची खेप पाठवली. आता तिला एनसीबीने ताब्यात घेतल्यानंतर नायजेरियन तस्कर फरार झाल्याचे कळते. एवढ्या मोठ्या कारवाईचा नागपुरातील अनेक वरिष्ठांना थांगपत्ताही नाही, हे विशेष!