३० टक्के कॅन्सर हा तंबाखूच्या सेवनामुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:41 AM2019-06-04T10:41:08+5:302019-06-04T10:42:17+5:30
तंबाखूच्या सवयीमुळे जगात दरवर्षी ६० लाख लोकांचा मृत्यू होतो, यात सुमारे १० लाख लोकांचा मृत्यू भारतात होतो. ही आकडेवारी क्षयरोग, अपघात, खून, आत्महत्या, एड्स व मलेरियाच्या तुलनेत अधिक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंबाखूच्या सवयीमुळे जगात दरवर्षी ६० लाख लोकांचा मृत्यू होतो, यात सुमारे १० लाख लोकांचा मृत्यू भारतात होतो. ही आकडेवारी क्षयरोग, अपघात, खून, आत्महत्या, एड्स व मलेरियाच्या तुलनेत अधिक आहे. हा आकडा २०३० पर्यंत प्रति वर्ष ८० लाख होण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे, कॅन्सरमध्ये ३० टक्के कॅन्सर हा तंबाखूच्या सेवनामुळे होतो, अशी माहिती मेडिकलच्या कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक दिवाण यांनी येथे दिली.
मेडिकलच्या कर्करोग विभागाच्यावतीने जागतिक तंबाखूविरोधी दिवसाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी अधिष्ठाता डॉ. एन.जी. तिरपुडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी, ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. लांजेवार, डॉ. बागडे, स्नेहांचल सामाजिक संस्थेच्या डॉ. रोहिणी पाटील उपस्थित होत्या.
डॉ. तिरपुडे यांनी तंबाखूच्या व्यसनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, या व्यसनात मोठ्या प्रमाणात युवावर्ग अडकत चालला आहे. यामुळे घराघरातून याची जनजागृती होणे आवश्यक आहे. डॉ. कांबळे यांनी तंबाखूमुळे होणाऱ्या विविध कॅन्सरची माहिती दिली. वेळीच निदान न झाल्यास मृत्यूचा धोका राहत असल्याचेही ते म्हणाले. डॉ. रोहिणी पाटील म्हणाल्या, मुखाचा कॅन्सर हा पुरुषांमध्ये सर्वाधिक आढळतो. तंबाखूशी संबंधित कॅन्सरमुळे ४२ टक्के पुरुषांचा मृत्यू तर १८.३० टक्के महिलांचा मृत्यू होतो, असेही त्या म्हणाल्या. संचालन डॉ. विजय महोपिया यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विभागाच्या डॉक्टरांसोबतच परिचारिका, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.