वायुप्रदूषणामुळे ३० टक्के लोकांना पक्षाघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 02:24 AM2018-07-22T02:24:20+5:302018-07-22T07:07:42+5:30
जगात दरवर्षी ९० लाख लोक वायुप्रदूषणाने मृत्यूमुखी पडतात.
नागपूर : वायुप्रदूषणाचे दुष्परिणाम अलीकडे मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागले आहेत. मेंदूरोग, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार आणि कॅन्सर होण्यामागे वायुप्रदूषण हे महत्त्वाचे कारण असल्याचे संशोधनातून सामोर आले आहे. जगात दरवर्षी ९० लाख लोक वायुप्रदूषणाने मृत्यूमुखी पडतात. एकट्या भारतात ही संख्या १८ लाख आहे, तर जगात ३० टक्के लोकांना पक्षाघात म्हणजेच ‘पॅरालिसिस’ वायुप्रदूषणामुळे होतो. यामुळे प्रदूषणाला घेऊन जनजागृती होणे व त्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक झाले आहे, अशी माहिती जागतिक ट्रॉपिकल न्यूरॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.
‘वर्ल्ड फेडेरेशन आॅफ न्यूरॉलॉजी’ व ‘इंडियन अकॅडमी आॅफ न्यूरॉलॉजी’च्या वतीने २२ जुलै हा दिवस जागतिक मेंदू दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला न्यूरोलॉजीच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला.
डॉ. मेश्राम म्हणाले, ‘निरोगी मेंदूकरिता स्वच्छ हवा’ हे या वर्षीचे घोषवाक्य आहे. १२० देशात हा उपक्रम राबविला जाणार आहे. ‘वर्ल्ड फेडेरेशन आॅफ न्यूरॉलॉजी’चे अध्यक्ष डॉ विलियम कॅरोल म्हणाले, वायुप्रदूषणामुळे वाढती पक्षाघातांची संख्या पाहता वायुप्रदूषणाला घेऊन जनजागृती होणे आवश्यक आहे. ‘वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरॉलॉजी’ने याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचा निर्णय घेतला.
पर्यावरण न्यूरॉलॉजीचे अध्यक्ष डॉ. जॅक्स रेइस यांनी सांगितले की, वायुप्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणामुळे होते. जगातील ९० टक्के लोक हे दूषित हवेत श्वास घेतात. जगातील ३० कोटी लोक हे आपल्या घरात स्वयंपाकाकरिता नकळत हानीकारक इंधनाचा वापर करतात, त्यामुळे घरातील तसेच परिसरातील हवा दूषित होते. भारतात दोन ते तीन घरात या हानीकारक इंधनाचा वापर होतो.