३० ते ३५ टक्के मुलांना अॅलर्जीचा त्रास; मेडिकलने सुरू केले अॅलर्जी तपासणी केंद्र
By सुमेध वाघमार | Published: September 25, 2023 06:04 PM2023-09-25T18:04:16+5:302023-09-25T18:05:47+5:30
राज्यातील पहिला उपक्रम
नागपूर : पूर्वी लहान मुलांमध्ये अॅलर्जीचे प्रमाण ५ टक्के होते, आता ते वाढून जागतिक स्तरावर ३० ते ३५ टक्क्यांवर पोहचले आहे. मुलांमध्ये अॅलर्जी खूप लवकर सुरू होते आणि लवकर निदान झाली नाही तर दमा आणि फुफ्फुसाच्या कार्यात कायमस्वरुपी घट होण्याचा धोका असतो. याची दखल घेत नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बालरोग विभागाने अॅलर्जी तपासणी सुरू केली आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.
- अॅलर्जीचे कारणे
नागपूर शहरातच नाही तर गावखेड्यातही आता धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नाक चोंदते. काही विशिष्ट प्रकारच्या अॅलजीर्मुळे तापही येतो. नाक चोंदणे, सतत सर्दी, खोकला होण्यासाठीही धूळ, माती, परागकण, वाहनांमधून निघणारी प्रदूषित हवाही कारणीभूत असते. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणीही सर्वसामान्यांना त्या सिमेंटचा त्रास होऊ शकतो. प्राण्यांचे केस, विष्ठा, घरातील धूळ, त्वचेवरचा संसर्ग, तंतुमय केस, सल्फा, अंडी, दूध, गहू, डाळ, डास चावणे, मधमाशीचा दंश, घरातील झुरळे ही अॅलजीर्ची महत्त्वाची कारणे आहेत.
यात अॅटोपिक त्वचारोग, अॅलर्जीक नासिकाशोध, दमा आणि अन्न अॅलर्जी हे काही अॅलर्जीचे उदाहरणे आहेत. वाढते रुग्ण पाहता मेडिकलच्या बालरोग विभागाने अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार व विभाग प्रमुख डॉ. मनीष तिवारी यांच्या नेतृत्वात विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. अभिषेक मधुरा यांनी अॅलर्जी, अस्थमा अॅलर्जी, रायनाटिस अॅटोपिक डर्माटायटिस अॅण्ड फुल अॅलर्जी’ आदींच्या चाचण्या सुरू करण्याची व्यवस्था उभी केली आहे.