३० गावांचा कारभार ३ कर्मचाऱ्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:09 AM2021-03-16T04:09:33+5:302021-03-16T04:09:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने नियमित व्यवहारांसाठी ग्राहकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने नियमित व्यवहारांसाठी ग्राहकांना तासनतास ताटकळत बसावे लागते. ३० गावांचा कारभार सांभाळणाऱ्या या बँकेत व्यवस्थापकासह केवळ तीनच कर्मचारी कार्यरत आहेत.
येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक असल्यामुळे त्यांना रात्रीही बँकेत थांबून काम पूर्ण करावे लागत आहे. कोरोनामुळे कित्येक लोकांच्या हातातील काम गेले. त्यामुळे बँकेमध्ये थोडेफार जमा करून ठेवलेले पैसे काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे असलेली जमापुंजी बँकेतून काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असली, तरी २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये २ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. जवळपास दोनशे बचत गटांची खाती उघडल्याची माहिती थडीपवनी येथील शाखा व्यवस्थापकांनी दिली. तसेच तीनच कर्मचारी असल्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. कर्मचारी कमी असल्याबाबत वरिष्ठांनाही कल्पना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कर्मचारी कमी असल्याचा सर्वाधिक फटका वयोवृद्ध नागरिकांना बसत आहे. एकाच कामासाठी ग्राहकांना जवळपास दोन ते तीनवेळा बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. कोरोना परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना वारंवार बँकेत यावे लागणे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, यासाठी आता स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.