विसर्जनासाठी ३०० कृत्रिम तळे व टँकची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:14 AM2019-09-03T00:14:42+5:302019-09-03T00:15:46+5:30
विसर्जनासाठी भाविकांना फिरावे लागणार नाही. ३०० हून अधिक कृत्रिम तळे व टँकची व्यवस्था केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशोत्सवात शहरात जवळपास १५०० सार्वजनिक मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन होते, तर घरगुती गणेश मूर्तीची संख्या दोन लाखांहून अधिक असते. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिकेने शहरातील गणेशभक्तांसाठी हायटेक पद्धतीने विसर्जनाची सुविधा उपलब्ध केली आहे. विसर्जनाकरिता नागरिकांना त्यांच्या घराजवळचे विसर्जन केंद्र शोधण्यासाठी ‘मोरया’ नावाचे अॅन्ड्रॉईड अॅप सुरू केले आहे. त्यामुळे विसर्जनासाठी भाविकांना फिरावे लागणार नाही. ३०० हून अधिक कृत्रिम तळे व टँकची व्यवस्था केली जाणार आहे.
गणेश विसर्जनासाठी सर्व झोनअंतर्गत सेंट्रींग, स्टील व प्लास्टिक टँकची व्यवस्था केली जाणार आहे तसेच जमिनीत खड्डे तयार करून ३६ विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहेत. पाच विसर्जन कुंड स्थायी स्वरूपाचे तयार करण्यात आले आहेत. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत सोनेगाव तलाव आणि अजनी चौक येथे प्रत्येकी एक, हनुमाननगर झोनअंतर्गत बिंझाणी महाविद्यालयाच्या मैदानात एक, गांधीसागर तलाव येथे एक तसेच मंगळवारी झोनअंतर्गत पोलीस लाईन टाकळी येथे एक असे पाच स्थायी स्वरूपाचे विसर्जन कुंड आहेत.
स्टीलचे कृत्रिम टँक
प्लास्टिकच्या कृत्रिम टँकवर महापालिके ला दरवर्षी लाखो रुपये खर्च करावे लागतात. प्लास्टिकचे टँक मोठ्या प्रमाणात नादुरुस्त होतात. याचा विचार करता महापालिकेने आता स्टीलचे कृत्रिम टँक उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. नाईक तलाव येथे गौरी विसर्जनासाठी कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली. तसेच उदयनगर येथे स्टीलचे कृत्रिम टँक ठेवण्यात आले आहे. शहराच्या इतर भागातही असे टँक उपलब्ध केले जाणार आहे.
६९ पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर करवाई
नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पोओपी मूर्ती विके्रत्यांवर गेल्या काही दिवसापासून महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई केली जात आहे. सोमवारी ६९ विक्रेत्यांवर कारवाई करून ५४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात झोननिहाय करण्यात आलेली कारवाई अशी:- लक्ष्मीनगर ३, धरमपेठ १८, धंतोली ६, नेहरूनगर १३, गांधीबाग १, लकडगंज २४, आसीनगर १ तर मंगळवारी झोनमध्ये एका विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. पथकांनी १९२ दुकानांची तपासणी केली.