रेल्वेच्या भंगारातून मिळाले ३०० कोटींचे घबाड
By नरेश डोंगरे | Published: January 18, 2024 08:19 PM2024-01-18T20:19:26+5:302024-01-18T20:20:25+5:30
अवधी शिल्लक, टार्गेट पूर्ण : रेल्वे प्रशासनन मालामाल
नागपूर : भंगारातून चक्क ३०० कोटींचे घबाड मध्य रेल्वेच्या हाती लागले आहे. प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, तिकिट तपासणी अशा वेगवेगळ्या मार्गाने रेल्वेला कोट्यवधी रुपये मिळत आहे. आता भंगारातूनही रेल्वे कोट्यवधी रुपये मिळवू लागली आहे.
रेल्वे प्रशासनाने उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत निर्माण करून गेल्या काही वर्षांत लाखो-करोडो रुपये मिळवणे सुरू केले आहे. तीन वर्षांपूर्वी झिरो स्क्रॅप मिशन राबविणे सुरू केले. त्यानुसार, रेल्वेचे विविध कार्यालये, डेपो आणि ठिकठिकाणी अस्तव्यस्त पडलेले भंगार एकत्रित करून विकण्याचा सपाटा लावण्यात आला. गेल्या वर्षी मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षांत भंगारातून ३०० कोटी रुपये मिळवण्याचे टार्गेट ठेवले होते. मात्र, हे आर्थिक वर्ष संपायला वेळ असतानाच एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेने आपल्या पाचही विभागातून एकूण ३०० कोटी, ४३ लाख रुपये मिळवले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न ३२.२३ टक्के जास्त आहे.
काय काय काढले भंगारात
रेल्वेचे एकूण २३ इंजिन, २५२ डब्बे आणि १४४ मालवाहू वॅगन आणि १२ किमी जामनेर-पाचोरा सेक्शन नॅरो गेज रुळ (लाईन) भंगारात विकण्यात आले. त्यातून ही रोकड रेल्वेला मिळाली.
कोणत्या विभागात किती कोटी मिळाले
भुसावळ विभाग ५९.१४ कोटी
माटुंगा डेपो ४७.४० कोटी
मुंबई विभाग ४२.११ कोटी
पुणे विभाग ३२.५१ कोटी
भुसावळ इलेक्ट्रिक लोको शेड डेपोने २७.२३ कोटी
सोलापूर विभाग २६.७३ कोटी
नागपूर विभागाने २४.९२ कोटी
मध्य रेल्वेच्या इतर ठिकाणी एकत्रितपणे ४०.३९ कोटी