नागपूर जिल्ह्यातील ३०० पंप कोरडे, सिलिंडरचा साठाही संपला, पंपावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा
By मोरेश्वर मानापुरे | Published: January 2, 2024 08:22 PM2024-01-02T20:22:05+5:302024-01-02T20:22:44+5:30
Nagpur: ट्रक आणि टँकरचालकांच्या संपामुळे मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. टँकरचालक संपावर तर नागरिक पंपावर अशी स्थिती झाली. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.
- मोरेश्वर मानापुरे
नागपूर - ट्रक आणि टँकरचालकांच्या संपामुळे मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. टँकरचालक संपावर तर नागरिक पंपावर अशी स्थिती झाली. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. मध्यरात्रीपर्यंत सर्वच पंप कोरडे झाले. अन्य जिल्हे आणि राज्यातून भाजीपाल्यांची आवक बंद असल्याने एकाच दिवसात भाव दुप्पट झाले. प्रशासनाने नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याची स्थिती निर्माण झाली.
जनजीवन झाले विस्कळीत, एकाच दिवसात वाढले भाज्यांचे भाव दुप्पट
थोडीफार स्थानिक उत्पादकांची आवक वगळता अन्य जिल्हे आणि राज्यातून भाज्यांची आवक मंगळवारी बंद होती. एकाच दिवसात भाव दुपटीवर गेले. कळमना बाजारात फूलकोबी ३०, भेंडी ६०, ढेमस ५०, पालक ३०, मेथीचे भाव ५० रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळमध्ये सर्वच भाज्याचे भाव प्रतिकिलो १०० रुपयांवर पोहोचले. शिवाय बहुतांश नागरिकांनी सकाळीच दुचाकीने पंपाकडे धाव घेतली. अनेक ठिकाणी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा होत्या. गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तब्बल १ तास वाट पाहावी लागली. त्यामुळे अन्य कामे थांबल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
टँकरचालक संपावर नागरिक पंपावर, गॅस सिलिंडरचाही साठा संपला
टँकरचालक संपावर तर नागरिक पंपावर अशी स्थिती मंगळवारी होती. अनेक पंपावर आणीबाणीची स्थिती दिसून आली. नागरिकांनीही सर्व कामे सोडून पंपावर धाव घेतली. अनेकांनी २ लिटरऐवजी ५ लिटर पेट्रोल भरले. त्यामुळे पंप कोरडे झाले. घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरची उपलब्धताही गंभीर आहे. दोन दिवस पुरवठा न झाल्यामुळे सिलिंडरचा साठाही संपत आला आहे. बुधवारपासून वाटप कसे करणार, अशी वितरकांसमोर समस्या आहे. त्यामुळे बुधवारी स्थिती अधिक गंभीर होणार आहे.
टँकरचालकांचा संप सुरूच
सलग दुसऱ्या दिवशीही ट्रक आणि टँकरचालकांचे आंदोलन सुरूच होते. अमरावती आणि भंडारा महामार्गावर चालकांनी ट्रक रस्त्यावर आडवे उभे केल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना कार जागेवर उभ्या कराव्या लागल्या. लग्नकार्य असो वा महत्त्वाच्या कामासाठी ते जाऊ शकले नाहीत. याकरिता अनेकांनी पोलिसांकडे मदत मागितली. पण त्यांनीही लोकांच्या मागणीकडे कानाडोळा केला. त्यामुळे या दोन्ही महामार्गावर दिवसभर स्थिती तणावपूर्ण होती.
बोरखेडीच्या भारत पेट्रोलियमच्या डेपोची सुरक्षा वाढविली
ट्रक व टँकरचालकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोरखेडी येथील भारत पेट्रोलियमच्या डेपोची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मंगळवारी या डेपोतून पोलिसांच्या सुरक्षतेत पेट्रोलचे १५ टँकर शहरात आले तर हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईलच्या प्रत्येकी तीन टँकरने पंपांवर पुरवठा झाला. सर्वच साठा सायंकाळपर्यंत संपला. मध्यरात्रीपर्यंत सर्वच पंप कोरडे झाले.
अनेकांचा सायकलने प्रवास!
पेट्रोलचा तुटवडा असल्याने काहीजण सायकलने प्रवास करीत असल्याचे दिसून आले. व्यायामासाठी सायकल चालवितो, आता कार्यालयात येण्यासाठी सायकलचा उपयोग करीत असल्याचे कुशल बक्षी यांनी सांगितले.