१ मिनिटात फोडल्या ३०० टाईल्स
By admin | Published: July 17, 2017 02:28 AM2017-07-17T02:28:10+5:302017-07-17T02:28:10+5:30
शस्त्राविना आत्मसंरक्षणाचे कौशल्य शिकविणारा खेळ म्हणजे कराटे. ब्रुसली, जेटली यांना पडद्यावर थरारक कराटे करताना पाहून
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शस्त्राविना आत्मसंरक्षणाचे कौशल्य शिकविणारा खेळ म्हणजे कराटे. ब्रुसली, जेटली यांना पडद्यावर थरारक कराटे करताना पाहून प्रत्येकात रोमांच जागा होतो. असाच रोमांच नागपूरच्या कार्तिक अनिल जयस्वाल याने रविवारी निर्माण केला. कराटे पारंगत कार्तिकने १ मिनिटात त्याने ३०० टाईल्स फोडण्याचे थरारक प्रात्यक्षिक करून विक्रमाला गवसणी घातली.
रविवारी संत रविदास सांस्कृतिक सभागृह हनुमाननगर येथे कार्तिकच्या थरारक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. दहा- दहा टाईल्सचे ३० कप्पे करण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजता कार्तिकने आपल्या विक्रमाला सुरुवात केली. त्याचा थरार बघण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. एक-एक करत कार्तिक सहजतेने टाईल्सचे कप्पे फोडत होता. प्रत्येक कप्पा फोडल्यानंतर त्याला उपस्थितांकडून भरभरून प्रोत्साहन मिळत होते. एका मिनिटात त्याने ३० ही कप्पे फोडून इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड आणि एशिया बुक आॅफ रेकॉर्डस् साठी आपले नाव नोंदविले.
यावेळी इंडिया बुक आॅफ रेकॉर्डसचे परीक्षक म्हणून डॉ. मनोज तत्त्ववादी उपस्थित होते. एशिया बुक आॅफ रेकॉर्डच्या परीक्षक म्हणून डॉ. सुनिता धोटे त्याचबरोबर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय कलचुपरी एकता महासंघाचे अध्यक्ष दीपक जयस्वाल, तेजस्विनी विद्यामंदिरचे अध्यक्ष डॉ. वागेश कटारिया व शिकाई असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष मजहर खान उपस्थित होते. कार्तिकने नुकताच दहावीची परीक्षा ८० टक्के उत्तीर्ण केली आहे. त्याने कराटेचे प्रशिक्षण मजहर खान यांच्याकडून घेतले आहे.
बालपणापासूनच कराटेचे आकर्षण होते. कराटेच्या बहुतांश परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. कराटे खेळातच रेकॉर्ड करण्याची मनिषा होती. भरपूर तयारी करावी लागली. हा विक्रम करताना शारीरिक व मानसिक तयारी करावी लागली. प्रशिक्षकांची त्यासाठी भरपूर मदत झाली. वडील अनिल व आई संगीता यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हा रेकॉर्ड करण्यात यश मिळाल्याचे कार्तिक याने सांगितले.