३०० वर रुग्णांवर जमिनीवर उपचार!
By admin | Published: December 14, 2014 12:42 AM2014-12-14T00:42:08+5:302014-12-14T00:42:08+5:30
गर्दीने ओसंडून वाहणारे वॉर्ड, ओपीडीच्या बाहेर भलीमोठी रांग, भरलेल्या खाटा अन् जमिनीवर गाद्या टाकून झोपलेले रुगण... हे उपराजधानीतील शासकीय रु ग्णालयातील चित्र रु ग्णांचे हाल स्पष्ट करणारे आहे.
मेयो, मेडिकलची विदारकता : लोकसंख्येच्या तुलनेत प्रति २३५ नागरिकांमध्ये १ खाट
सुमेध वाघमारे - नागपूर
गर्दीने ओसंडून वाहणारे वॉर्ड, ओपीडीच्या बाहेर भलीमोठी रांग, भरलेल्या खाटा अन् जमिनीवर गाद्या टाकून झोपलेले रुगण... हे उपराजधानीतील शासकीय रु ग्णालयातील चित्र रु ग्णांचे हाल स्पष्ट करणारे आहे. मेडिकल व मेयो या दोन्ही रुग्णालयांच्या खाटांची क्षमता १ हजार ९९५ आहे, मात्र रुग्णांची संख्या २ हजार २९५ पर्यंत जाते, ज्यातील सुमारे ३०० वर रुग्णांना खाट मिळत नाही. विशेष म्हणजे या दोन्ही रुग्णालयातील २०० वर बाळंतीणीला आपल्या नवजात शिशूला कवटाळून जमिनीवर उपचार घ्यावे लागतात.
विशेष म्हणजे, शहरात सर्व मिळून ६५६ रुग्णालयांमध्ये १० हजार ६४५ खाटांची संख्या आहे. दहा हजार लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांसाठी १०० खाटा असणे गरजेचे आहे. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत प्रति २३५ नागरिकांमध्ये १ खाट असे प्रमाण येत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
शहर वाढत आहे, त्यातुलनेत रुग्णालयांची संख्या अपुरी पडत आहे. शहरात दुर्दैवाने एखादे नैसर्गिक संकट आले आणि त्यामध्ये २० हजार नागरिक पीडित झाले तर काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. धन्वंतरीचे पाईक रुग्णसेवेसाठी तत्पर असतील, पण सेवा देणारे कुठे हाच प्रश्न भविष्यात समोर येणार आहे. २०११ साली २० लाख लोकसंख्या असलेले नागपूर शहर २५ लाख लोकसंख्येच्या पुढे सरकले आहे. शहरात मनपाचे ३७ दवाखाने, १२ हेल्थ पोस्ट व १० माता-बाल संगोपन केंदे्र आहेत. यातील महापालिकेच्या पाचपावली दवाखान्यात १०, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ८० तर इमामवाडा येथील आयसोलेशन दवाखान्यात ४० खाटा अशा एकूण १३० रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था आहे. शहरात तीन शासकीय रुग्णालये महत्त्वाची आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) खाटांची संख्या १ हजार ४०० आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) खाटांची संख्या ५९० आहे, तर डागा रुग्णालयात ३३५ खाटांची सोय आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही सोय तोकडी पडत आहे.
३५ महिला रुग्णाला खाटाच उपलब्ध नाही
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ३० वर्षांपूर्वी मंजूर असलेल्या खाटांची संख्या आजही कायम आहे. या रुग्णालयात ५९४ मंजूर खाटा आहेत. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता या खाटा अपुऱ्या पडतात. या रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात खाटांची संख्या ७० आहे. मात्र १०५ रुग्ण असल्याने ३५ रुग्णांना खाटेच्या अभावी जमिनीवर उपचार घेण्याची वेळ आली आहे.
२५ वर्षांपासून शासनाची उदासीनता
उपराजधानीची लोकसंख्या २५ लाखावर गेली आहे. या लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय रुग्णालयात १३ हजार खाटा असणे गरजेचे आहे, मात्र रुग्णालयात फक्त २ हजार ४०० खाटा उपलब्ध आहेत. नियमानुसार ५० टक्केही खाटा उपलब्ध नाहीत. ही स्थिती मागील २५ वर्षांपासून आहे, यावरून शासन गरीब आणि सामान्यांच्या आरोग्याला घेऊन किती उदासीन आहे, हे दिसून येते.