नागपूर आयटीआयमधील ९६० जागांसाठी ३ हजारावर अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 10:33 AM2019-07-04T10:33:09+5:302019-07-04T10:42:24+5:30
नागपूर आयटीआयमध्ये २५ ट्रेडमध्ये ९६० जागा असून, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ३००४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) ची प्रवेश प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली. नागपूर आयटीआयमध्ये २५ ट्रेडमध्ये ९६० जागा असून, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ३००४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. गेल्या काही वर्षात आयटीआयकडे कल वाढल्याने आयटीआयमध्ये ८० ते ८५ टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची पसंती मिळत असल्याचे प्राचार्य हेमंत आवारे यांनी सांगितले.
नागपूरच्या शासकीय आयटीआयमध्ये दहावी पास विद्यार्थ्यांसाठी एक व दोन वर्ष मुदतीचे २५ ट्रेड आहे. गेल्या काही वर्षात आयटीआय अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे दरवर्षी सर्वच ट्रेडला १०० टक्के प्रवेश असतात. आयटीआयची संपूर्ण प्रक्रिया व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून आॅनलाईन राबविण्यात येते. यावर्षी आॅनलाईन अर्ज करण्याची अंतिम तिथी ३० जून होती. ४ जुलैला पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी लागणार आहे. त्यावर ५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप घ्यायचे आहे. ९ जुलैला पहिल्या फेरीची अंतिम मेरिट लिस्ट लागणार आहे. ११ ते १५ जुलै दरम्यान पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करायचे आहे. त्यानंतर १९ ते २४ जुलै दरम्यान दुसऱ्या फेरीची प्रक्रिया पार पडणार आहे. १० ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.
जे विद्यार्थी १ ते ३० जून दरम्यान अर्ज करू शकले नाही. त्यांच्यासाठी २२ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान अर्ज करण्याची संधी आहे. १३ ऑगस्टला रिक्त जागांची यादी लागणार आहे. त्यानंतर १६ ऑगस्टपासून स्पॉट अॅडमिशनची प्रक्रिया पार पडणार आहे.
या ट्रेडकडे विशेष कल
इलेक्ट्रीशियन, फिटर, टर्नर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मशिनिस्ट, पेंटर, सव्र्ेिअर, डिझेल मेकॅनिक, प्लंबर, स्टेनो इंग्लिश, मराठी या ट्रेडला विद्यार्थ्यांचा जास्त कल आहे. नागपूरचा आयटीआय राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ओढा शासकीय आयटीआयकडे आहे.