३० हजार कि.मी.चे रस्ते लवकरच पक्के होणार : गृहमंत्री अनिल देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 10:04 PM2020-02-08T22:04:55+5:302020-02-08T22:06:28+5:30
शहरी वाहतूक व्यवस्थेच्या सुविधेसोबतच ग्रामीण क्षेत्रातील दळणवळण सुविधा उच्च दर्जाची करण्यासाठी लवकरच ग्रामीण क्षेत्रातील ३० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड/नागपूर : शहरी वाहतूक व्यवस्थेच्या सुविधेसोबतच ग्रामीण क्षेत्रातील दळणवळण सुविधा उच्च दर्जाची करण्यासाठी लवकरच ग्रामीण क्षेत्रातील ३० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन २०२० मधील नरखेड तालुक्यातील खापरी केने येथील रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती नरखेडच्या सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, जिल्हा परिषद सदस्या पूनम जोध, नरखेड पंचायत समिती सदस्या माया मोढोरिया, खापरी केने ग्रामपंचायतच्या सरपंच अश्विनी केने, उपसरपंच नेत्राम सोनेकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, अधीक्षक अभियंता एन. एस. अन्सारी, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे, उपअभियंता राजेंद्र जैन आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या सहकायार्तून येत्या काळामध्ये ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासोबतच उच्च दर्जाच्या दळणवळण सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिले. गृहमंत्री देशमुख म्हणाले, राज्यात लवकरच ८ हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. बेरोजगारांनी या संधीचा फायदा घ्यावा. तसेच अवैध सावकारीला चाप लावण्यासाठी याबाबत अडचणी असल्यास थेट माझ्याजवळ तक्रार नोंदवावी, असे आवाहनही केले.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वंकष प्रयत्न : हसन मुश्रीफ
राज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही ग्रामविकास विभागाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण क्षेत्राचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासोबतच ग्रामीण क्षेत्रातील दळणवळण व्यवस्था उच्च दर्जाची करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या कालावधीत ग्रामीण क्षेत्रात ३० हजार कि. मी. चे रस्ते लवकरच बांधण्यात येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.