१४ महिन्यांच्या भ्रमंतीत ३,०१७ किमीचा प्रवास : ‘त्या’ वाघाची रेडिओ कॉलर वनविभागाने काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 09:51 PM2020-04-01T21:51:24+5:302020-04-01T21:53:21+5:30
मागील १४ महिन्यात तब्बल ३,०१७ किलोमीटरचा प्रवास करून आपल्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र निवडणाऱ्या सी-१ या वाघाचे रेडिओ कॉलर वन विभागाने काढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील १४ महिन्यात तब्बल ३,०१७ किलोमीटरचा प्रवास करून आपल्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र निवडणाऱ्या सी-१ या वाघाचे रेडिओ कॉलर वन विभागाने काढले आहे. आता त्याचे अधिवास क्षेत्र निश्चित झाल्याने यापुढे त्याच्यावर कॅमेरा ट्रॅपने नजर ठेवली जाणार आहे.
टिपेश्वर अभयारण्यातील सी-१ या वयात आलेल्या वाघाला फेब्रुवारी-२०१९ मध्ये रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. तेव्हा तो टिपेश्वर अभयारण्यात होता. त्यानंतर जून -२०२० पर्यंत तो याच परिसरात होता. मात्र त्यानंतर त्याने स्वतंत्र अधिवासाचा शोध घेणे सुरू केले. आदिलाबाद, महाबळेश्वर, पुन्हा आदिलाबाद, पैनगंगा, इसापूर, वाशीम असा १४ महिन्याच्या काळात ३,०१७ किलोमीटर भ्रमंती करून आता तो ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला आहे.
व्याघ्र अभ्यासकांच्या मते, त्याने हे क्षेत्र आपल्या सुरक्षित अधिवासासाठी निवडले आहे. या वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आले होते तेव्हा तो लहान होता, तसेच त्याचा अधिवास निश्चित व्हायचा होता. आता तो मोठा झाला असून अधिवासही निश्चित झाला आहे. यासंदर्भात प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी बुधवारी दुपारी माध्यमांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला असून, त्यात या वाघाला लावलेले कॉलर काढल्याची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी त्याला लावलेल्या रेडिओ कॉलरची बॅटरीही आता संपण्याच्या बेतात आली होती. तसेच मानेभोवती लावलेले रेडिओ कॉलर वाढत्या वयात घट्ट होऊन भविष्यात त्याच्या मानेला इजा होण्याची शक्यता होती. त्यामुळे २८ मार्चला रिमोटच्या साह्याने त्याला लावलेले कॉलर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तब्बल १४ महिने ३,०१७ किलोमीटर फिरून एखाद्या वाघाने आपला अधिवास निश्चित करणे ही निसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाची घटना आहे. या निमित्ताने आम्हा सर्वांसाठीच ही नवीन माहिती मिळाली आहे.
नितीन काकोडकर, प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव)
अशा काढतात रेडिओ कॉलर
वाघाला रेडिओ कॉलर लावताना पकडून व बेशुद्ध करून तो लावला जातो. मात्र काढताना त्याला पकडण्याची गरज नसते. वाघापासून १०० मीटर अंतरावर थांबून रिमोटच्या साह्याने ती काढली जाते. रिमोटची कळ दाबताच त्याच्या गळ्यातील पट्टा (कॉलर) निसटून खाली पडतो.