३०२ अतिक्रमणाचा सफाया : ३७ हजार दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:10 AM2021-03-04T04:10:30+5:302021-03-04T04:10:30+5:30
महापालिकेची कारवाई : चार ट्रक साहित्य जप्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेने शहरातील रस्ते व फुटपाथवरील अतिक्रमण कारवाईची ...
महापालिकेची कारवाई : चार ट्रक साहित्य जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेने शहरातील रस्ते व फुटपाथवरील अतिक्रमण कारवाईची मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी शहरातील ३०२ अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. यादरम्यान पथकाने ३७ हजार रुपयांचा दंड वसूल करून चार ट्रक साहित्य, तर सहा ठेले जप्त केले.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार शहरात अतिक्रमण कारवाई हाेत आहे. मंगळवारी हनुमाननगर झोनअंतर्गत तुकडोजी पुतळा, क्रीडा चौक, मेडिकल चौक, येथील मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील व फुटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. धंतोली झोनमध्ये नरेंद्रनगर, महालक्ष्मी अपार्टमेंट येथील अतिक्रमण काढण्यात आले. नेहरूनगरमधील भांडे प्लॉट, सक्करदरा येथील अतिक्रमण हटविण्यात आले. गांधीबाग झोन येथील विजय दत्तात्रय वैद्य यांनी मौजा नागपूर येथील शिट क्रमांक २५० नगर भूमापन क्रमांक ३८५, आराजी १२८ चौ.फुट जागेपैकी, ४५ क्षेत्र रस्त्यात बाधित होत होते. त्याचे पक्के बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. यानंतर बाळा अनासने यांनी शिट क्रमांक २०५, नगर भूमापन क्रमांक ३८५ क्षेत्र ७.०० चौ.फुट जागेवर पक्के दुकानाचे बांधकाम केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ५० अन्वये सदर आदेश पारीत करण्यात आले होते. त्यानुसार १० फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांना यासंदर्भात नोटीस जारी करण्यात आली होती. परंतु, नोटीसला कुठलही प्रतिसाद न दिल्यामुळे हे बांधकाम महापालिकेच्या पथकाने तोडले.
सतरंजीपुरा झोनअंतर्गत दही बाजार पुलीया, मारवाडी चौक, जुना भंडारा रोड, शहीद चौक येथील अतिक्रमणाचा सफाया पथकाने केला. आशीनगर झोन येथील पाठंकर चौक परिसरातील संपूर्ण अतिक्रमण हटविण्यात आले. मंगळवारी झोनंतर्गत पागल खाना चौक, मानकापूर चौक झिंगाबाई टाकळी, अवस्थीनगर, गिट्टीखदान चौक येथे फुटपाथरील अतिक्रमण काढण्यात आले.