कोरोनाच्या काळात ३०३ किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:08 AM2021-05-15T04:08:05+5:302021-05-15T04:08:05+5:30
नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी या काळातही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने २०२०-२१ या कालावधीत ३०३ ...
नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी या काळातही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने २०२०-२१ या कालावधीत ३०३ किलोमीटर नव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण केले असून इतिहासात आतापर्यंत हे सर्वात अधिक झालेले काम आहे.
दपूम रेल्वेने जबलपूर-गोंदिया रेल्वे मार्गाचे काम पूर्ण केले असून यामुळे जबलपूरवरून बल्लारशाह दरम्यान २७६ किलोमिटरचे अंतर कमी झाले आहे. याशिवाय चिरईडोंगरीवरून मंडला फोर्ट मार्गाचे काम पुर्ण होताच कान्हा नॅशनल पार्क रेल्वे मार्ग भारताच्या प्रमुख शहरांशी जोडल्या गेला आहे. कटंगी ते तिरोडी नव्या मार्गाच्या कामामुळे बालाघाटवरून नागपूरसाठी पर्यायी मार्ग तयार झाला आहे. छिंदवाडा-सिवनी दरम्यान ९० किलोमिटरचे ब्रॉडगेजचे काम पुर्ण करण्यात आले आहे. झारसुगडा-ब्रजराजनगर आणि राजनांदगाव-डोंगरगड दरम्यान तिसरी लाईन पुर्ण झाल्यामुळे आता डोंगरगडवरून झारसुगडापर्यंत तिसऱ्या लाईनचे काम पुर्ण करण्यात आले आहे. याशिवाय मंडला फोर्ट, चिरईडोंगरी, तिरोडी गुड्स शेडचे काम पुर्ण झाल्यामुळे माल वाहतूक वाढणार आहे. सन २०२०-२१ मध्ये एकुण १३ रेल्वेस्थानकाच्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम तसेच डोंगरगड-राजनांदगाव दरम्यान दोन्ही दिशांमध्ये ऑटो सिग्नलिंगचे काम पुर्ण करण्यात आले आहे. याच वर्षी ७७ किलोमिटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण करण्यात आले आहे. याशिवाय अतिरिक्त ३१३ रेल्वे क्वार्टर, ११ रेल्वे ओव्हरब्रीज, ३३ अंडरब्रीज तयार करण्यात आले आहेत. यासोबतच इलेक्ट्रीक लोकोशेड तसेच पॅसेंजर आणि मालगाडीच्या डब्यांच्या देखभालीसाठी अतिरिक्त मेन्टेनन्स शेड तयार करण्याचे काम भिलाई, बिलासपूर आणि इतवारी रेल्वेस्थानकावर करण्यात आले आहे.