नागपुरात १८ महिन्यात ३१ यकृत प्रत्यारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:02 AM2019-10-11T00:02:52+5:302019-10-11T00:03:50+5:30
उपराजधानीत गेल्या १८ महिन्यापासून सुरू झालेले यकृत प्रत्यारोपण आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करीत आहे. विजयादशमीच्या दिवशी ४३ वर्षीय ब्रेन डेड व्यक्तीने यकृत दान केल्याने प्रत्यारोपणाचा आकडा आता ३१ वर पोहचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नातेवाईकांचा संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे ‘ब्रेन डेड’ झालेल्या व्यक्तीकडून अवयवदानाचा टक्का वाढत आहे. अनेकांना नवे आयुष्य मिळत आहे. विशेषत: उपराजधानीत गेल्या १८ महिन्यापासून सुरू झालेले यकृत प्रत्यारोपण आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करीत आहे. विजयादशमीच्या दिवशी ४३ वर्षीय ब्रेन डेड व्यक्तीने यकृत दान केल्याने प्रत्यारोपणाचा आकडा आता ३१ वर पोहचला आहे.
नरेश पटले (४३) रा. तिरखेडी गोंदिया, असे त्या अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, पटले यांना ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याने त्यांना सुरुवातीला गोंदिया येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. परंतु उपचाराला प्रतिसाद मिळाला नसल्याने ७ ऑक्टोबर रोजी पटले यांचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याची माहिती डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबाला दिली. सोबतच अवयवदानाचा सल्लाही दिला. कुटुंबांनी आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेत मूत्रपिंड, यकृत व नेत्रदानासाठी पुढाकार घेतला. ‘झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर’ने (झेडटीसीसी) पुढील प्रक्रिया पूर्ण केली. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी योग्य नव्हते. यकृत न्यू इरा हॉस्पिटलमधील एका रुग्णाला देण्यात आले, तर नेत्र महात्मे नेत्रपेढीला दान करण्यात आले. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. विजेंद्र किरनाके, डॉ. साहिल बन्सल, डॉ. सुशृत, डॉ. सविता जयस्वाल, डॉ. अश्विनी व डॉ. अमोल कोकास यांनी यशस्वी केली. यांना हॉस्पिटलचे संचालक कार्डीओथॉरेसीक तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती, न्यूरोसर्जन डॉ. नीलेश अग्रवाल व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निधीश मिश्रा यांचे मार्गदर्शन लाभले.
अवयवदानात नागपूर तिसऱ्या स्थानी
डॉ. आनंद संचेती म्हणाले, राज्यात अवयवदानात नागपूर नवव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. नागपुरात अवयवदानाचा प्रयत्न २०१३ पासून सुरू झाला. या सहा वर्षांत ५३ मेंदूमृत व्यक्तीने १४५ अवयवांचे दान केले आहे. यात एकट्या न्यू इरा हॉस्पिटलमध्ये मागील आठ महिन्यात ४० प्रत्यारोपण झाले आहेत. यात २५ यकृत, १४ मूत्रपिंड व १ हृदय प्रत्यारोपणाचा समावेश आहे.