नागपूर जिल्ह्यात ११९८ जागांसाठी ३१२१ उमेदवारांचे अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:10 AM2020-12-31T04:10:11+5:302020-12-31T04:10:11+5:30
नागपूर : नागपूर जिल्ह्यात १३० ग्रा.पं.च्या ११९८ जागांसाठी ३१२१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल ...
नागपूर : नागपूर जिल्ह्यात १३० ग्रा.पं.च्या ११९८ जागांसाठी ३१२१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे १३ ही तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती. १३ ही तालुक्यात कोरोनाप्रतिबंधक उपायोजनांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
गेली दोन दिवस ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाच्या सर्व्हर डाऊनचा फटका बसला. यासोबतच अनेक गावात बुधवारी सकाळपर्यंत विविध राजकीय गटांचे पॅनेल निश्चित झाले नव्हते. त्यामुळे मंगळवारपर्यंत उमेदवारी अर्जांची संख्या कमी होती. निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केल्यानंतर अनेकांचा जीव भांड्यात पडला. बुधवारी १३ ही तालुक्यात एकाचवेळी अर्ज सादर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने निवडणूक यंत्रणेची तारांबळ उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू होती.
१३ तालुक्यांमध्ये तहसीलदारांमार्फत निवडणुकीचा कार्यक्रम जारी करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजतानंतर तालुका स्तरावर करण्यात येईल. उमेदवारांना ४ जानेवारी रोजी दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. याच दिवशी दुपारी ३ नंतर उमेदवारांची अंतिम याची प्रसिद्ध होईल आणि निवडणूक चिन्हाचे वाटपही करण्यात येतील.
१५ जानेवारी रोजी फैसला
जिल्ह्यातील १३ तालुक्यातील १३० ग्राम पंचायतीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होईल. यासाठी ५०५ मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. सकाळी ७ ते सांयकाळी ५.३० पर्यंत मतदान घेण्यात येईल. निवडणूक होऊ घातलेल्या ग्रा.पं.साठी एकूण २,९१,०८७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात १,५१,७८९ पुरुष तर १,३९,२९६ महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती प्रभारी अधिकारी ग्रा.पं.निवडणूक डॉ.शिवनंदा लंगडापुरे यांनी दिली.