सिंचन घोटाळ्यावर ३१३४ पानांची तक्रार
By Admin | Published: February 27, 2015 02:09 AM2015-02-27T02:09:51+5:302015-02-27T02:09:51+5:30
जनमंच या सामाजिक संस्थेतर्फे गुरुवारी विदर्भातील सिंचन प्रकल्पांत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात एकूण १२ खंडांमध्ये ३१३४ पानांची तक्रार
नागपूर : जनमंच या सामाजिक संस्थेतर्फे गुरुवारी विदर्भातील सिंचन प्रकल्पांत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात एकूण १२ खंडांमध्ये ३१३४ पानांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलीस अधीक्षकांसमक्ष सादर करण्यात आली. या पुराव्यांच्या आधारावर पारदर्शी व कठोर चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची संस्थेची मागणी आहे.
या तक्रारीत एकट्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या निविदेवर केलेल्या अभ्यासाचा लेखाजोखा आहे. प्रकल्पाच्या निविदेची कागदपत्रे मिळवून सखोल पडताळणी केल्यानंतर प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले. कंत्राटदार व महामंडळाचे अधिकारी यांनी संगनमताने कट रचून हा घोटाळा केला, असा दावा जन मंचने केला आहे. निविदेवर कंत्राटदारांच्या बोलीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या अपेक्षित खर्चामध्ये अवाढव्य वाढ केली. कंत्राटदारांची बोली व प्रकल्पाचा अपेक्षित खर्च यात पाच टक्क्यांपेक्षा जास्त फरक राहू नये यासाठी हा गैरप्रकार करण्यात आला. हा फरक पाच टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागते. वित्त विभागाचा हस्तक्षेप टाळण्यासाठी व महामंडळाच्या अधिकारक्षेत्राखालीच खर्चाला मंजुरी देण्याकरिता अपेक्षित खर्च वाढविण्यात आला.
कंत्राटदारांना बांधकामविषयक किमान निकषांचा पुरेसा अनुभव नव्हता. मूल्यमापन समितीने कंत्राटदारांना लाभ पोहोचविण्यासाठी याकडे दुर्लक्ष केले. तसेच, कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराची पुरेशी बोली सादर करण्याची क्षमता नव्हती. त्यांनी सत्य परिस्थिती लपवून महामंडळाची दिशाभूल केली. बोलीच्या प्रक्रियेत काहीच गुणवत्ता नसून तो केवळ एक देखावा होता. सर्व कंत्राटदार एका विशिष्ट कटांतर्गत एकत्र आले होते. त्यांनी स्वत:च्या छुप्या कंपन्यांनाही सहभागी करून घेतले होते. हा घोटाळा फौजदारी कटाचे उदाहरण आहे, याकडे तक्रारीत लक्ष वेधण्यात आले आहे. पुराव्यांमध्ये खोडतोड होण्याची शक्यता पाहता सध्याच्या परिस्थितीत विशिष्ट स्वरुपाची माहिती सादर करता येणार नाही, असेही तक्रारीत स्पष्ट करण्यात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)