पाणीटंचाईसाठी ३१.५५ कोटींचा आराखडा : नितीन राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:01 AM2020-04-24T00:01:03+5:302020-04-24T00:01:46+5:30
पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना अपूर्ण पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात याव्यात, तसेच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना अपूर्ण पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात याव्यात, तसेच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
बचतभवन सभागृहात पाणीटंचाई आराखडा अंमलबजावणी आढावा बैठक गुरुवारी पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे जिल्ह्यात तीन टप्प्यात पाणीटंचाई कृती आराखडा राबविण्यात येत असून यासाठी ३१ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये ९०९ गावांमध्ये प्रस्तावित केलेल्या १ हजार ४८८ योजनांचा समावेश आहे. जिल्ह्यात कामठी तालुक्यात बिडगाव व तरोडी खुर्द या दोन गावांत तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी बैठकीत दिली. बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, खा. कृपाल तुमाने, आ. समीर मेघे, आ. आशिष जैस्वाल, आ. टेकचंद सावरकर, आ. राजू पारवे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर, नगर परिषदांचे अध्यक्ष तसेच विविध अंमलबजावणी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
असे आहेत निर्देश
- टंचाई आराखड्याचे अपूर्ण नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करताना ज्या पाणीपुरवठा योजना वीजजोडणीअभावी प्रलंबित आहेत अशा योजनांना प्राधान्याने वीजजोडणी करावी, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
- काटोल व नरखेड तालुक्यात पाणीटंचाई आराखड्यानुसार तात्काळ उपाययोजना पूर्ण करण्यात याव्यात. तसेच नरखेड नगर परिषदेने पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या.
असा आहे आराखडा
- जिल्ह्यातील ९०९ गावांसाठी १ हजार ४४८ उपाययोजना.
- ३८१ नवीन विंधन विहिरी, २६३ नळ योजनांची दुरुस्ती.
- ८७ गावांना टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करणे.
- २१२ विहिरी खोल करणे, गाळ काढणे.
- ५०३ खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे.