संसर्गाच्या भीतीमुळे नागपूर विभागात ३१६ रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:21 AM2020-06-09T10:21:40+5:302020-06-09T10:24:49+5:30
अवयवदानात नागपूर राज्यात तिसऱ्या स्थानी आले आहे. परंतु यंदा दोनच रुग्णाकडून अवयवदान होऊ शकले.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व समाजात रुजत असतानाच ‘लॉकडाऊन’मुळे व रुग्णाला संसर्ग होण्याच्या भीतीने गेल्या अडीच महिन्यापासून विदर्भात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद पडली आहे. परिणामी, मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्णांची संख्या ३१६ तर यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्णांची संख्या ९६ वर पोहचली आहे. मृत्यूच्या दाढेत हे रुग्ण जगत आहेत. अवयवदानात नागपूर राज्यात तिसऱ्या स्थानी आले आहे. ‘झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन कमिटी’ नागपूरच्या (झेडटीसीसी) अथक परिश्रमामुळे हे शक्य होऊ शकले. विशेष म्हणजे, २०१३ मध्ये ‘झेडटीसीसी’ कार्याला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी एकाच व्यक्तीकडून अवयवदान झाले. मात्र, त्यानंतर अवयवदानाची ही चळवळ वाढत गेली. २०१४ मध्ये तीन, २०१५ मध्ये चार, २०१६ मध्ये सहा, २०१७ मध्ये १४, २०१८ मध्ये १८ तर २०१९ मध्येही १८ ‘ब्रेनडेड’ व्यक्तीकडून अवयवदान करण्यात आले. परंतु यंदा दोनच रुग्णाकडून अवयवदान होऊ शकले.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २० वर रुग्णांची प्रतीक्षा
दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. या रुग्णालयात आतापर्यंत ६३ मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले आहेत. परंतु येथेही मार्च महिन्यापासून मूत्रपिंड प्रत्यारोपण थांबविण्यात आले आहे. विशेष म्हणजे येथील २० वर रुग्णांकडे अवयवदाता उपलब्ध आहे.
सहा वर्षात १११ मूत्रपिंड, ४७ यकृत, १२ हृदय, तीन फुफ्फुसाचे प्रत्यारोपण
२०१३ ते २०१९ या कालावधीत नागपूर विभागात १०९ मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण झाले. याच कालावधीत १२ हृदय काढण्यात आले. यातील तीन चेन्नई, एक दिल्ली, आठ मुंबईत तर एक हृदय प्रत्यारोपण नागपूर विभागात करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत ४७ यकृत मिळाले. यातील पाच पुणे, एक औरंगाबाद, सहा मुंबई तर गेल्या दोन वर्षांत नागपूर विभागात ३५ यकृताचे प्रत्यारोपण झाले. आतापर्यंत केवळ तीनच फुफ्फुसाचे दान झाले. यातील दोन मुंबई तर तिसरे तेलंगणा विभागात प्रत्यारोपण झाले. यावर्षी दोन अवयवदात्याकडून मिळालेल्या चार मूत्रपिंड, दोन यकृताचे दान होऊ शकले. यामुळे मोठ्या संख्येत रुग्ण अवयवाच्या व प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना करून प्रत्यारोपण सुरू करणे शक्य
प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना जे औषधे दिले जाते त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. परिणामी, कोविड-१९ चा धोका होण्याची शक्यता अधिक राहते. यामुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. परंतु आता प्रतिबंधात्मक उपाययोजना करून प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू केल्या जाऊ शकतात.
- डॉ. संजय कोलते, सचिव, ‘झेडटीसीसी, नागपूर झोन
अत्यंत गरजू रुग्ण समोर आला नाही
या अडीच महिन्याच्या काळात प्रत्यारोपणासाठी किंवा अवयवासाठी अत्यंत गरजू रुग्ण झेडटीसीसीकडे आला नाही. असा रुग्ण पुढे आला असता तर नक्कीच मदत केली असती. परंतु आता कोविडशी लढा देत अवयवदानाला व प्रत्यारोपणाला गती दिली जाईल.
- डॉ. विभावरी दाणी, अध्यक्ष, झेडटीसीसी, नागपूर झोन