नागपूर विभागात सहा महिन्यांत वीज कोसळून ३२ जणांचा मृत्यू; ७० जनावरेही ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 09:31 PM2022-07-02T21:31:49+5:302022-07-02T21:32:15+5:30
Nagpur News नागपूर विभागात मागील सहा महिन्यांत वीज कोसळून तब्बल ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक १० जणांचा मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाला आहे.
नागपूर : नागपूर विभागात मागील सहा महिन्यांत वीज कोसळून तब्बल ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक १० जणांचा मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाला आहे. इतकेच नव्हे, तर विभागात ७० जनावरेही वीज पडून मृत्युमुखी पडली आहेत.
पावसाळ्यात वीज पडून मृत्युमुखी पडण्याचे प्रकार घडत असतात. नागपूर विभागाचाच विचार केला, तर या वर्षी आतापर्यंत ३२ व्यक्ती मृत्युमुखी पडलेले आहेत. यात जिल्हानिहाय विचार केला असता, नागपूर १०, चंद्रपूर ७, गोंदिया ७, भंडारा ४, वर्धा २ आणि गडचिरोली जिल्ह्यात २ जण वीज पडून मृत्युमुखी पडले. यात जनावरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. सहा महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात २० जनावरांचा मृत्यू झाला. त्यानंतर, नागपूर जिल्ह्यात १५, वर्धा १२, भंडारा ११, गोंदिया ८ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ४ जनावरांचा मृत्यू झाला.
- नागपूर जिल्ह्यात चार वर्षांत ७२ मृत्यू
नागपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे ७२ जणांचा मृत्यू झाला. यात वीज पडून ५९ जणांचा मृत्यू, पुरात वाहून ९ जणांचा, झाड पडून २ व भिंत पडून २ जणांचा मृत्यू झाला.