सरकारी नोकरीच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची फसवणूक; ३२ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 01:27 PM2023-02-16T13:27:00+5:302023-02-16T13:28:17+5:30

अमरावती, वाशिममधील तीनही आरोपी फरार

32 lakh duped from unemployed youth in the name of government job | सरकारी नोकरीच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची फसवणूक; ३२ लाखांचा गंडा

सरकारी नोकरीच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची फसवणूक; ३२ लाखांचा गंडा

Next

नागपूर : बेरोजगार मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची व इतर उमेदवारांची तीन ठकबाजांनी तब्बल ३२ लाखांनी फसवणूक केली. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तीनही आरोपी अमरावती व वाशिम जिल्ह्यातील असून, सर्वजण फरार आहेत.

शंकर धन्नोजी धुराटे (६३, काटोल मार्ग) यांच्या मुलाला नोकरीची आवश्यकता होती. मुलासाठी काहीही करून सरकारी नोकरी मिळवायचीच, असा विचार करून धुराटे यांनी काही जणांकडे शब्द टाकला. एका परिचिताकडून त्यांना आरोपी सचिन रामराव गायकवाड (३०, अजनीनगर, नेरपिंगळई), किरण सचिन गायकवाड (२७, अजनीनगर, नेरपिंगळई) व अरुण रामराव ठाकरे (४५, वाशिम) यांच्याशी ओळख झाली.

सरकारी नोकरीच्या बदल्यात पैसे लागतील, असे सांगितले. ही रक्कम ४० लाखांपेक्षा अधिक असेल, असेही त्यांनी सांगितले. अखेर ३२ लाख ३७ हजारांमध्ये सौदा ठरला. त्यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्हेरायटी चौकातील एका चहा टपरीजवळ धुराटे यांना पैसे घेऊन बोलविले व तेथे सौदा निश्चित केला. १२ जून २०१९ ते २५ मे २०२२ या कालावधीत आरोपींनी धुराटे व इतर उमेदवारांकडून वेळोवेळी पैसे घेतले. मात्र, नोकरी लावून दिली नाही. त्यांना विचारणा केल्यावर ते दरवेळी काही ना काही कारण द्यायचे. अखेर आपली फसवणूक झाली असल्याचे धुराटे यांच्या लक्षात आले. त्यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

Web Title: 32 lakh duped from unemployed youth in the name of government job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.