नागपुरात माध्यान्ह भोजनातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 10:13 PM2020-02-07T22:13:11+5:302020-02-07T22:14:45+5:30

मारोतराव मुडे हायस्कूल, हुडकेश्वर येथील ३२ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. विद्यार्थ्यांना सुरुवातीला शाळेजवळील इस्पितळात नेले, परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहत सायंकाळी ५ च्या सुमारास सर्व विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये दाखल केले.

32 students poisoned by lunch at Nagpur | नागपुरात माध्यान्ह भोजनातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा

नागपुरात माध्यान्ह भोजनातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा

Next
ठळक मुद्देमेडिकलमध्ये उपचार : दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मारोतराव मुडे हायस्कूल, हुडकेश्वर येथील ३२ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. विद्यार्थ्यांना सुरुवातीला शाळेजवळील इस्पितळात नेले, परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहत सायंकाळी ५ च्या सुमारास सर्व विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. बालरोग विभागाच्या डॉक्टर, परिचारिकांनी तातडीने उपचाराला सुरुवात केली. डॉक्टरानुसार, विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून दोन विद्यार्थ्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना पेडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट’मध्ये (पीआयसीयू) दाखल केले.
पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या मारोतराव हायस्कूल येथे शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास भोजनाची सुटी झाली. या शाळेत शगुन महिला बचत गटाच्यावतीने माध्यान्ह भोजन दिले जाते. आज माध्यान्ह भोजनात भात व बरबटीची पातळ भाजी देण्यात आली. सुमारे २३३ विद्यार्थी जेवले. दुपारी ३ वाजता सुटी संपल्यानंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. परंतु काही वेळातच दोन-तीन मुलांना पोटात दुखणे व मळमळणे सुरू झाले. हळुहळु ही संख्या वाढत गेली. दोन विद्यार्थ्यांना उलट्याही झाल्या. शिक्षकांनी याचे गांभीर्य लक्षात घेत प्राचार्य पांडुरंग लांबट यांना याची माहिती दिली. त्यांनी २१ विद्यार्थ्यांना शाळेजवळच्या एका खासगी इस्पितळात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करीत विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास या विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन आणि त्यांच्या डॉक्टरांच्या चमूने उपचाराला सुरुवात केली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनीही विद्यार्थ्यांना भेट देत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यांनी संबंधित डॉक्टरांना आवश्यक सूचनाही केल्या. यावेळी त्यांच्यासोबत उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा लांजेवार,कॅज्युल्टी मेडिकल ऑफिसर डॉ. अंकिता खेमले, डॉ. वैशाली वानखेडे, डॉ.श्याम राठोड, डॉ. पंजाब चिरमारे, मेट्रन मालती डोंगरे, डॉ. मुरारी सिंग व इतरही डॉक्टर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये ११ मुली २१ मुले
मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ११ मुली व २१ मुले आहेत. यातील एक दहावीचा विद्यार्थी आहे. इतर विद्यार्थी सातवी ते नववीतील आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये वर्ग ‘६वा ब’च्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याची माहिती आहे.

विद्यार्थ्यांना रात्रभर ठेवणार-डॉ. जैन
डॉ. दीप्ती जैन म्हणाल्या, खाद्य पदार्थामधून होणारी विषबाधेची लक्षणे काहीवेळा उशीरा दिसून येतात. रुग्ण गंभीर होण्याची शक्यता असते. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत. येथे आणल्यावर कुणालाच उलट्या झालेल्या नाहीत. केवळ पोटदुखी आणि मळमळल्यासारखे वाटत असल्याची लक्षणे होती. खबरदारी कॅज्युल्टीमधून सर्व विद्यार्थ्यांना वॉर्डात हलविले. दोन विद्यार्थ्यांचा रक्तदाब कमी झाल्याने खबरदारी म्हणून ‘पीआयसीयू’मध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती बरी राहिल्यास सुटी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापनामुळे तातडीने उपचार
अधिष्ठाता डॉ. मित्रा यांच्या मार्गदर्शनात याच वर्षी मेडिकलमध्ये आपत्ती व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली. यासाठी ‘मेडिसीन कॅज्युल्टी’लगत २० खाटांचा स्वतंत्र कक्षही तयार करण्यात आला होता. सायंकाळी ३० विद्यार्थी ‘कॅज्युल्टी’मध्ये येताच या समितीने तातडीने या कक्षात विद्यार्थ्यांना दाखल करून घेतले. सलाईनपासून इतर औषधे उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे, तीन रुग्णांमागे एक परिचारिका व एक डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून होते.

बंद झालेले पाकगृह विद्यार्थ्यांसाठी उघडले
सायंकाळी ५ वाजता विद्यार्थी दाखल झाल्यानंतर उपचाराला सुरुवात झाली. रात्री ८ वाजता विद्यार्थ्यांना भूक लागली होती. याची दखल अधिष्ठाता डॉ. मित्रा व उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. लांजेवार यांनी घेतली. परंतु सायंकाळी ५ वाजता रुग्णांना भोजन दिल्यानंतर पाकगृह बंद होते. अधिक्षकांनी याची माहिती पाकगृहातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना फोनद्वारे दिली. घरी गेलेले कर्मचारी मानवी दृष्टिकोनातून पुन्हा पाकगृहात आले. खिचडी तयार केली. रात्री ९ वाजता सर्व विद्यार्थ्यांना दिली. मेडिकल प्रशासनाने घेतलेल्या या पुढाकाराचे शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पालकांनी कौतुक केले.

Web Title: 32 students poisoned by lunch at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.