अन् दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेहच सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 05:41 PM2022-06-24T17:41:08+5:302022-06-24T17:41:28+5:30
शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठ्याच्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मंगेशचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
जलालखेडा (नागपूर) : दाेन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (दि. २४) सकाळी ८ वाजेच्या सुमारास पाणीपुरवठ्याच्या विहिरीत तरंगताना आढळून आला. त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) येथे घडली.
मंगेश गोविंदराव नाडेकर (३२, रा. जलालखेडा, ता. नरखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगेश दाेन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. ग्रामपंचायत कर्मचारी किसना वाडकर, (रा. जलालखेडा) हे शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठ्याच्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यासाठी गेले असता, त्यांना विहिरीत मंगेशचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
ताे दाेन दिवसांपासून घरी परत न आल्याने गुरुवारी (दि. २३) सायंकाळी ताे बेपत्ता असल्याची पाेलिसांत तक्रार नाेंदविली हाेती, असेही त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात पाठविला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
आठवडाभरातील दुसरी घटना
जलालखेडा येथील आठवडाभरातील आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. अभिजित खेडकर (२६, रा. जलालखेडा) याने साेमवारी (दि. २०) घरी गळफास लावून आत्महत्या केली. मंगेशची पत्नी आजारी असल्याने शस्त्रक्रियेनंतर ती विश्रांती घेण्यासाठी माहेरी गेली हाेती. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मंगेश काही महिन्यांपासून मानसिक तणावात हाेता, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. यातून त्याने टाेकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.