३२ वर्षे होऊनही सावित्रींच्या लेकींना मिळतो १ रुपयाच उपस्थिती भत्ता! पुरोगामी महाराष्ट्रात अशीही थट्टा
By गणेश हुड | Published: December 7, 2023 05:01 PM2023-12-07T17:01:41+5:302023-12-07T17:02:03+5:30
विद्यार्थीनींना उपस्थित दिवसाकरिता प्रतिदिन १ रूपया दैनिक भत्ता देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १० जानेवारी १९९२ रोजी घेतला होता. मागील ३२ वर्षात यात छदामही वाढविलेला नाही.
नागपूर : मुलींची शाळेतील उपस्थिती वाढावी यासाठी ३२ वर्षापूर्वी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शाळेत उपस्थित विद्यार्थीनींना प्रतिदिन १ रुपया दैनिक भत्ता सुरू केला होता. मात्र ३२ वर्षात भत्त्यात एक पैशाचीही वाढ झालेली नाही. मुलींना शिक्षण मिळावे, यासाठी महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी चळवळ उभारली आणि मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. त्याच पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात राज्याच्या शिक्षण विभागाकडून सावित्रीच्या लेकींची ही एक प्रकारे थट्टाच आहे.
राज्यात आर्थिक दुर्बल घटक, आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती अशा प्रवर्गातील दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील सावित्रीच्या लेकींना नियमित शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी, त्यांची गळती थांबावी यासाठी तीन दशकांपासून राज्य सरकारतर्फे प्रतिदिन एक रुपया प्रोत्साहन भत्ता दिला जातो.
इयत्ता १ली ते ४ थी च्या विद्यार्थीनींची शाळेतील उपस्थिती ७५ टक्केपेक्षा अधिक असेल अशा विद्यार्थीनींना उपस्थित दिवसाकरिता प्रतिदिन १ रूपया दैनिक भत्ता देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १० जानेवारी १९९२ रोजी घेतला होता. मागील ३२ वर्षात यात छदामही वाढविलेला नाही.
मिळतात २२० रुपये अन् बचत खात्यासाठी लागतात १००० रुपये
या योजनेअंतर्गत फार तर या विद्यार्थीनींना वर्षाला २०० ते २२० रूपये मिळतात. परंतू विद्यार्थ्यांना कोणताही आर्थिक लाभ डीबीटी अंतर्गत देणे बंधनकारक असताना त्यांना राष्ट्रीयकृत बँकेत १ हजाररूपये गुंतवून बचत खाते काढणे अनिवार्य आहे. म्हणजे ४ वर्षात मिळणारा भत्ता फक्त बँकेचे बचत खाते उघडण्यातच खर्च होतो. त्यात या खात्यावर नियमित व्यवहार होत नसल्याने बँकेकडून शुल्ककपात करतात. ही तर शासनाची संवेदनशुन्यता.
३२ वर्षात महागाई वाढली. त्याप्रमाणात अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिधींच्या वेतन व भत्त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली , परंतू ३२ वर्षात गरिब विद्यार्थीनींच्या भत्त्यात एका छदामाची वाढ केली नाही. ही विद्यार्थीनींची थट्टाच म्हणावी लागेल. शासनाने या भत्त्यात वाढ करून प्रतिदिन २० रुपये एवढा भत्ता लागू करावा, असं जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नागपूरचे लीलाधर ठाकरे म्हणाले.