जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी डॉक्टरचा तब्बल ३२ वर्षे संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 01:18 PM2022-04-18T13:18:05+5:302022-04-18T14:59:16+5:30
इंगोले यांची १.२८ हेक्टर जमीन औष्णिक वीज प्रकल्पाकरिता संपादित करण्यात आली आहे.
नागपूर : चंद्रपूर येथील एका डॉक्टरला त्यांच्या संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळविण्यासाठी तब्बल ३२ वर्षे संघर्ष करावा लागला. सुरुवातीला त्यांना दिवाणी न्यायालयाने मोबदला वाढवून दिला होता, पण उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाचा तो निर्णय रद्द केला. त्यामुळे डॉक्टरला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली व तेथे त्यांना गेल्या ११ एप्रिल रोजी दिलासा मिळाला.
डॉ. शेषराव इंगोले असे डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी जमिनीचा मोबदला वाढविण्यासाठी सुरुवातीला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ३० एप्रिल २००३ रोजी दिवाणी न्यायालयाने समान क्षेत्रातील जमिनीचे दर लक्षात घेता, त्यांना ९ लाख २५ हजार ६५० रुपये प्रतिहेक्टर मोबदला मंजूर केला. परिणामी, महानिर्मिती कंपनीने या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले होते.
२ फेब्रुवारी २०१६ रोजी उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाचा निर्णय रद्द करून १ लाख ७५ हजार रुपये प्रतिहेक्टर हा मूळ मोबदलाच योग्य ठरविला. करिता, इंगोले यांनी वरिष्ठ ॲड. संजय हेगडे व ॲड. आकाश मून यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय हेमंत गुप्ता व व्ही. रामासुब्रमण्यम यांनी विविध बाबी लक्षात घेता, उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करून दिवाणी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे इंगोले यांना दिलासा मिळाला.
१.२८ हेक्टर जमीन संपादित
इंगोले यांची १.२८ हेक्टर जमीन औष्णिक वीज प्रकल्पाकरिता संपादित करण्यात आली आहे. २ मे १९९० रोजी त्यांना १ लाख ७५ हजार रुपये प्रतिहेक्टर मोबदल्याचा अवॉर्ड जारी करण्यात आला होता. हा मोबदला इंगोले यांना अमान्य होता.