नागपूर जिल्ह्यात ३२२ शाळा विजेविना : थकीत बिलापोटी पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:56 PM2019-02-08T23:56:49+5:302019-02-08T23:58:41+5:30
जिल्हा परिषदेच्या शिक्षणाच्या दुरावस्थेवरून स्थायी समितीच्या बैठकीत चांगलीच आगपाखड झाली. जि.प. सदस्य मनोज तितरमारे यांनी जिल्ह्यात किती शाळांमध्ये वीज नाही, असा सवाल सभागृहात केला असता, शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ३२२ शाळा विजेविना असल्याचा खुलासा केला. प्रत्येक शाळा डिजिटल करण्यात येत आहे, शाळेत वीजपुरवठाच नसेल तर शाळा डिजिटल कशा होणार, असा संताप व्यक्त करीत विरोधी सदस्यांनी चांगलीच आगपाखड केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षणाच्या दुरावस्थेवरून स्थायी समितीच्या बैठकीत चांगलीच आगपाखड झाली. जि.प. सदस्य मनोज तितरमारे यांनी जिल्ह्यात किती शाळांमध्ये वीज नाही, असा सवाल सभागृहात केला असता, शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ३२२ शाळा विजेविना असल्याचा खुलासा केला. प्रत्येक शाळा डिजिटल करण्यात येत आहे, शाळेत वीजपुरवठाच नसेल तर शाळा डिजिटल कशा होणार, असा संताप व्यक्त करीत विरोधी सदस्यांनी चांगलीच आगपाखड केली.
जि.प.च्या अखत्यारित येणाऱ्या १५३९ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. १६ उच्च माध्यमिकच्या शाळा आहेत. यापैकी ८७८ शाळांचे डिजिटलायझेशन झाले आहे. या शाळांमध्ये डिजिटल क्लास रूम सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर, एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. एकिकडे शाळांचे डिजिटलायझेशन करुन विद्यार्थ्यांचा सरकारी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल ३२२ शाळांमधील वीज पुरवठा हा वीज बिलाचा भरणा केल्या नसल्याने मागील अनेक वर्षांपासून वीज जोडणीच कापण्यात आली आहे. यामुळे या शाळांचा कारभार अंधारात सुरू आहे. ही उर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातील शाळांची परिस्थिती आहे. यंदाच्या जि.प.च्या अर्थसंकल्पात अशाप्रकारे वीज जोडणी कापण्यात आलेल्या शाळांच्ये थकीत वीज देयक भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद का केली नाही. या शाळांना अंधारातच ठेवणार का, असा सवाल सदस्यांनी केला.
शाळेकडून वीज बिलासंदर्भात कुठलीही मागणी नाही
अनेक वर्षांपासून या शाळांची वीज कापण्यात आली आहे. गेल्यावर्षी २ लाखाचा निधी वीज बिलासाठी शाळांना वाटण्यात आला होता. यंदा वीज देयक भरण्यासंदर्भात कुठल्याच शाळेकडून प्रस्ताव आला नाही.
उकेश चव्हाण, शिक्षण सभापती, जि.प.