कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले ३२.५० लाख
By admin | Published: February 2, 2017 02:09 AM2017-02-02T02:09:17+5:302017-02-02T02:09:17+5:30
चिखली कळमना येथील उद्योगपतीच्या कंपनीतून चोरीला गेलेल्या ५० लाख रुपयांपैकी ३२ लाख ५० हजार रुपये बुधवारी जप्त करण्यात आले.
५० लाखाच्या चोरीच्या घटनेतील खुलासा
नागपूर : चिखली कळमना येथील उद्योगपतीच्या कंपनीतून चोरीला गेलेल्या ५० लाख रुपयांपैकी ३२ लाख ५० हजार रुपये बुधवारी जप्त करण्यात आले. यामुळे संशयाच्या आधारावर अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यावरील संशय बळावला आहे.
२९ जानेवारी रोजी रात्री चिखली येथील प्रकाश वाधवानी यांच्या कंपनीतून ५० लाख रुपये चोरीला गेले. वाधवानी यांचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी ५० लाखरुपयांची रक्कम कंपनीत ठेवली होती. चोरांनी डुप्लीकेट चावीने कंपनीचे मुख्य गेट, कार्यालय आणि आलमारीचे कुलूप उघडले होते. त्यात तीन पोत्यांमध्ये ५० लाख रुपये ठेवले होते. या चोरीमध्ये कंपनीतीलच व्यक्तींचा हात असल्याचा संशय होता. पोत्यांचे वजन जवळपास ६० किलो होते. त्यामुळे कंपनीमध्येच रक्कम लपवून ठेवण्यात आल्याचाही त्यांना संशय होता. ते दोन दिवसांपासून कंपनीतच शोध घेत होते. बुधवारी सायंकाळी त्यांना कंपनीच्या मागच्या बाजूला कचऱ्याच्या ढिगात लपवून ठेवलेली दोन पोती आढळून आली. वाधवानी यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी दोन्ही पोती ताब्यात घेतली. यात ३२ लाख ५० हजार रुपये होते. या चोरीप्रकरणी कंपनीच्याच एका कर्मचाऱ्यावर संशय आहे.