ॲडव्हान्स टॅक्सच्या नावाखाली ३२.५० लाख घेतले अन मुलीच्या एमबीबीएसच्या शिक्षणाला लावले
By योगेश पांडे | Published: February 28, 2024 06:38 PM2024-02-28T18:38:39+5:302024-02-28T18:40:02+5:30
टॅक्स कन्सल्टंटकडून प्रॉपर्टी डिलरची फसवणूक
नागपूर : इन्कमटॅक्स वाचविण्यासाठी लोक टॅक्स कन्सल्टंटकडे धाव घेताना दिसतात. मात्र एका कन्सल्टंटवर आंधळा विश्वास ठेवणे एका प्रॉपर्टी डिलरचा चांगलेच महागात पडले. संबंधित आरोपीने ॲडव्हान्स टॅक्सच्या नावाखाली ३२.५० लाख रुपये घेतले व ते पैसे सरकारकडे जमा न करता स्वत:च्या मुलीच्या एमबीबीएसच्या शिक्षणासाठी वापरले. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मोहम्मद युनूस मोहम्मद यामीन (५४, दसरा रोड, महाल) असे तक्रारदाराचे नाव आहे. तर ठाकूर कन्सल्टन्सी ॲंड असोसिएट्समधील अनिल शिवनाथसिंह ठाकूर (५२, निर्मलनगरी, उमरेड मार्ग) असे आरोपीचे नाव आहे. मोहम्मद युनूसने एक जमीन विकली होती व त्याला २.८० कोटी मिळाले होते. २०२२-२३ च्या ॲडव्हान्स टॅक्स भरण्यासाठी त्यांनी ठाकूरला संपर्क केला. दोन वेगवेगळ्या महिन्यात रक्कम भरली तर इन्कमटॅक्समध्ये सूट मिळेल अशी बतावणी ठाकूरने केली. त्यानुसार नोव्हेंबर व डिसेंबर २०२२ मध्ये मोहम्मद युनूसने ठाकूर यांच्या खात्यात ३२.५० लाख रुपये भरले. मात्र त्यानंतर ठाकूरने त्यांना कुठलीही पावती दिली नाही. त्याला विचारणा केली असता ते पैसे मुलीला परदेशात एमबीबीएसच्या शिक्षणासाठी वापरल्याचे सांगितले. जानेवारी २०२३ मध्ये ठाकूरने स्टॅम्पपेपरवर पैसे परत करण्याची बाब लिहून दिली. मात्र वर्ष होऊनदेखील त्याने एकही पैसा परत केला नाही. मोहम्मद युनूस यांनी चौकशी केली असता ठाकूरने अनेकांची फसवणूक केल्याची बाब समजली. अखेर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर अनिल ठाकूरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.