अपहरण झालेल्या ३३ मुली-महिला अद्यापी गायबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 08:00 AM2023-01-25T08:00:00+5:302023-01-25T08:00:01+5:30

Nagpur News महिला अत्याचारांसोबतच शहरात महिला व मुलींच्या अपहरणाचे प्रमाणही वाढीस लागले आहे. २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये अपहरणाच्या गुन्ह्यांचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक वाढले.

33 abducted girls and women are still missing | अपहरण झालेल्या ३३ मुली-महिला अद्यापी गायबच

अपहरण झालेल्या ३३ मुली-महिला अद्यापी गायबच

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात अपहरणाचे प्रमाण वाढीस ९३ टक्के प्रकरणांचा उलगडा

योगेश पांडे

नागपूर : पोलिस प्रशासनाकडून महिला सुरक्षेचे दावे करण्यात येत असले, तरी महिला अत्याचारांचे वाढते गुन्हे जळजळीत वास्तव स्पष्ट करत आहेत. महिला अत्याचारांसोबतच शहरात महिला व मुलींच्या अपहरणाचे प्रमाणही वाढीस लागले आहे. २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये अपहरणाच्या गुन्ह्यांचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक वाढले. आश्चर्याची बाब म्हणजे, २०२२ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांतील ९३ टक्के प्रकरणांचा उलगडा झाला असला, तरी ३३ मुली-महिलांचा शोध लागलेला नाही.

नागपूर पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०२१ साली ४१५ महिला-मुलींचे अपहरण झाले होते व त्यातील ३५६ जणांचा शोध लागला होता. २०२२ मध्ये या आकड्यांत वाढ झाली. वर्षभरात अपहरणाचे ४६० गुन्हे नोंदविले गेले व त्यातील ४२७ जणींचा शोध लागला. याची टक्केवारी ९३ टक्के इतकी होती. मात्र, ३३ मुली व महिला गायबच आहेत. या महिला व मुली नेमक्या कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दोन वर्षांत ८० हून अधिक जणांचा शोध नाही

२०२१ व २०२२ या दोन वर्षांतील आकडेवारीकडे नजर टाकली असता, ९२ मुली व महिलांचा काहीच पत्ता लागला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील काही मुली व महिलांची माहिती मिळाली असून, अद्यापही ८० हून अधिक जणांचा शोध सुरूच आहे.

दरवर्षी सरासरी ४४८ अपहरणाचे गुन्हे

मागील पाच वर्षांच्या आकडेवारीकडे नजर टाकली असता, महिला व मुलींच्या अपहरणाचे २ हजार २४३ गुन्हे दाखल झाले. दरवर्षी सरासरी ४४८ गुन्ह्यांची नोंद झाली. २०२० मध्ये सर्वाधिक ५३६ अपहरणाची प्रकरणे समोर आली होती.

यामुळे वाढत आहेत गुन्हे

- अल्पवयीन मुली विविध कारणांमुळे घर सोडून जातात. त्या हरवल्या असल्या, तरी नियमांनुसार अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद होते.

- घरातील वादांना कंटाळून अनेक जण घर सोडतात किंवा पळून जातात.

- प्रेमप्रकरणांत प्रियकरासोबत पळ काढला जातो व मग अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद होते.

- आपापसातील वादातून अनेकदा महिला-मुलींचे अपहरण होते.

 

अपहरण दरात देशात आठव्या स्थानी

लॉकडाऊन असूनही गुन्हेगार निर्ढावलेले होते व २०२१ मध्ये महिलांच्या अपहरणाचा राज्यातील सर्वाधिक दर नागपुरातच नोंदविण्यात आला. २०२० मध्ये अपहरणाच्या गुन्ह्यांचा दर २०.१ तर २०२१ मध्ये १६.६ इतका होता. नागपूरचा देशात आठवा क्रमांक होता.

Web Title: 33 abducted girls and women are still missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kidnappingअपहरण