महामेट्रोच्या तिकिट शुल्कात ३३ टक्के सवलत! १ मार्चपासून नवीन बदल
By मोरेश्वर मानापुरे | Published: February 29, 2024 09:24 PM2024-02-29T21:24:13+5:302024-02-29T21:24:21+5:30
विद्यार्थ्यांना भरघोष सूट
माेरेश्वर मानापुरे, नागपूर : शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या उन्हाळ्याच्या सुट्या लक्षात घेता महामेट्रो नागपूरने प्रवासी भाड्यामध्ये बदल केले असून नवे दर १ मार्चपासून लागू होतील. ते दर सध्याच्या भाड्याच्या तुलनेत ३३ टक्क्यांनी कमी असतील.
या अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगरपर्यंत आता ३० रुपयांऐवजी २५ रुपये आणि विद्यार्थ्यांना ३० टक्के सवलतीसह १८ रुपये द्यावे लागतील. सोबतच महामेट्रो प्रवाशांकरिता ‘कॅश बॅक’ ची संकल्पना लवकरच लागू होणार आहे. या सेवेंतर्गत एका महिन्यात महाकार्ड वापरणाऱ्या प्रवाशाला मेट्रोने प्रवास करत तिकीट दराच्या माध्यमातून एकूण ८०० रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास त्याला कॅश बॅकच्या माध्यमातून १० टक्के पॉईंट मिळेल. या योजनेला अंतिम स्वरूप देणे सुरू आहे. प्रवाशी संख्या वाढविण्याचा उद्देश आहे. मेट्रोने विकेंड सवलत ३० टक्के, राजपत्रित सुट्टी ३० टक्के, डेली पास १०० रुपये या उपाययोजना केल्या आहेत. मेट्रोच्या ४०.०२ किमीच्या प्रवासात ३६ स्टेशन कार्यरत आहेत.
मेट्रोने नुकतेच आठ मेट्रो स्थानकांवर फिडर ऑटोरिक्षा सेवा आणि मनपा व एमआयएलच्या संयुक्त विद्यमाने विमानतळ ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत शटलबस सुरू केली आहे. सध्या खापरी, प्रजापतीनगर, ऑटोमोटिव्ह चौक आणि लोकमान्यनगर या चार टर्मिनलवरून दररोज सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत दर १५ मिनिटांनी, त्यातच सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत दर दहा मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू आहे. ही वेळ पुन्हा कमी करण्याचा प्रयत्न आहे.