३३ डाक कार्यालय सीएससीशी जुळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 11:09 AM2020-12-18T11:09:09+5:302020-12-18T11:09:31+5:30
Nagpur News post offices डाक विभागाने त्यांच्या काॅमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) ची संख्या वाढविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. याअंतर्गत शहरातील २२ डाक कार्यालयांना सीएससी सेवेशी जाेडण्याचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डाक विभागाने त्यांच्या काॅमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) ची संख्या वाढविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. याअंतर्गत शहरातील २२ डाक कार्यालयांना सीएससी सेवेशी जाेडण्याचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविला आहे. सध्या शहरातील ११ डाक कार्यालयात हे सेंटर संचालित आहेत.
अधिकाधिक महसूल प्राप्त करण्यासाठी विभागाला काॅमन सर्व्हिस सेंटरकडून अधिक अपेक्षा आहेत. या आधारे नागरिकांना आधार अपडेशन, पासपाेर्ट, पॅनकार्ड तयार करण्याच्या साेयी मिळतात. याशिवाय पीएम आवास याेजना, पीएम पीक विमा याेजना, अन्न औषधाचा परवाना, एफसीआय नाेंदणी, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, जीवन प्रमाणपत्र, रेल्वे आरक्षण आदी सुविधा सुद्धा या केंद्रावर देण्यात येत आहेत. शहरात एकूण ६६ डाक कार्यालय आहेत आणि या सर्व कार्यालयात सीएससी केंद्र सुरू करण्याचा विभागाचा विचार आहे, असे सहायक अधीक्षक गणेश आंभाेरे यांनी सांगितले, प्रत्येक डाक कार्यालयात सीएससी सुरू केल्याने नागरिकांना अधिक सुविधा मिळतील. त्यासाठी लाेकांना संबंधित कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहणार नाही. जवळच्या डाक कार्यालयातच ते आपले काम सहज पूर्ण करू शकतील.