अजनी रेल्वेस्थानकाजवळ ३३३ कोटींचा लक्ष्मण झुला; २१ महिन्यांत होणार काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 06:14 PM2023-02-13T18:14:33+5:302023-02-13T18:15:27+5:30
अजनी ते मेडिकल चौकापर्यंत लांब : ८२३ मीटरचा केबल स्टेट ब्रीज
नागपूर : मुख्य रेल्वेस्थानकालगत बांधण्यात आलेल्या रामझुल्याने शहरातील वाहतुकीचा ताण कमी केला आहे. शहराच्या वैभवातही भर घातली आहे. आता अजनी रेल्वेस्थानकाजवळ लक्ष्मण झुला बांधण्यात येणार आहे. अजनी ते मेडिकल चाैकापर्यंतच्या या पुलाची लांबी २८३ मीटर राहणार असून २१ महिन्यांत त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले जाते.
अजनीचा पूल कधीचाच कालबाह्य झाला असून धोका लक्षात घेता यावरची जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. पूर्व नागपूर - पश्चिम नागपूर असे दोन भाग जोडणाऱ्या या पुलावरून वाहनांची प्रचंड वर्दळ असते. जवळपास रोजच वाहनांची कोंडी होते अन् त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रासही होतो. त्यामुळे हा पूल लवकर बांधला जावा, अशी नागरिकांची मागणी होती. या पार्श्वभूमीवर, लक्ष्मण झुला बांधण्याचा निर्णय झाला.
पुलाच्या बांधकामासाठी जागा मोकळी करून देण्याची जबाबदारी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडे होती. त्यानुसार मध्य रेल्वेने दुकानदारांना नोटीस देऊन ही जागा मोकळी करून दिली आहे. त्यामुळे अजनीत लक्ष्मण झुला (केबल स्टेड ब्रीज) बांधकामासाठी माती परीक्षणाचे काम सुरू झाले आहे. अंडर ग्राउंड पाइपलाइन आणि वायरिंग शिफ्टिंगच्याही कामाला गती दिली जात आहे. त्याचे ड्रॉइंग मध्य रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागाने तयार केले असून या विभागातील वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून ही ड्रॉइंग तपासली जात आहे. लवकरच त्यासंबंधाने अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते.
हावडा ब्रीज अन् राम-लक्ष्मण झुला
ब्रिटिश काळात कोलकाता येथे हावडा ब्रीज बांधण्यात आला. त्यानंतर नागपुरात रामझुला स्टेड ब्रीजची निर्मिती झाली. आता अजनीत असाच पूल लक्ष्मण झुला नावाने बांधला जाणार आहे. एकाच शहरात अशा प्रकारे दोन पूल बांधण्यात येणारे नागपूर हे मध्य भारतातील पहिले शहर ठरणार असल्याचे अधिकारी म्हणतात.
दोन महिन्यांनंतर तुटणार पूल
लक्ष्मण झुल्याच्या बांधकामासाठी सध्या असलेला पूल तोडण्यात येईल. पूल तोडताना रेल्वे गाड्यांच्या आवागमनावर होणारा परिणाम, उडणारी धूळ, त्यामुळे होणारे प्रदूषण या सर्व बाबींचा विचार करून योग्य ते निर्णय घेतले जाणार आहेत.
दोन टप्प्यात काम
सहा लेनच्या लक्ष्मण झुल्याचे बांधकाम दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात एक मार्ग आणि दुसऱ्या टप्प्यात दुसरा मार्ग म्हणजे अप-डाउन असे हे काम राहील, अशी सूत्रांची माहिती आहे. ‘लक्ष्मण झुला’ प्रकल्पाचा सध्याचा खर्च ३३३ कोटी रुपये आहे. नेत्रदीपक रोषणाई करून हा झुला कम पूल आकर्षक करण्याची योजना आहे.