७ वर्षांत सापडल्या ३४ लाख बनावट नोटा
By admin | Published: May 28, 2016 02:46 AM2016-05-28T02:46:27+5:302016-05-28T02:46:27+5:30
बनावट नोट ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी समस्या बनलेली आहे. देशभरात गेल्या ७ वर्षांमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ३४ लाख बनावट नोटा आढळून आल्या.
१५९ कोटींचे मूल्य : ५०० रुपयांच्या नोटांची संख्या सर्वाधिक
नागपूर : बनावट नोट ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी समस्या बनलेली आहे. देशभरात गेल्या ७ वर्षांमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ३४ लाख बनावट नोटा आढळून आल्या. या नोटांचे मूल्य १५९ कोटी रुपयांहून अधिक आहे.अर्थव्यवस्था पोखरण्यासाठी प्रत्यक्षामध्ये बाजारात याहून अधिक बनावट नोटा आणल्या गेल्या आहेत. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी बनावट नोटांसंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेकडे विचारणा केली होती. २००९ पासून देशात किती बनावट नोटा आढळल्या, त्यांचे मूल्य किती होते, सर्वाधिक बनावट नोटा कोणत्या होत्या इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार एप्रिल २००९ ते डिसेंबर २०१५ या कालावधीमध्ये देशभरात ३४ लाख ३ हजार ३१८ बनावट नोटा आढळून आल्या. यांचे मूल्य १५९ कोटी ४४ लाख ७३ हजार २५ इतके आहे. २०१४-१५ या कालावधीत सर्वात जास्त ५ लाख ९४ हजार ४४६ बनावट नोटा आढळल्या.
एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत ३ हजार ९ बनावट नोटा या दैनंदिन व्यवहारादरम्यान आढळून आल्या. २० हजार ३८४ नोटा या बँकामधील आपापसातील व्यवहारात सापडल्या. २३ हजार ३९३ नोटा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाला सापडल्या, तर ४ लाख ४० हजार ७१६ बनावट नोटा विविध बँकाना आढळून आल्या.
१००० रुपयांच्या ६ लाखाहून अधिक बनावट नोटा
मिळालेल्या माहितीनुसार या कालावधीत देशभरातील विविध बँकांत ३४ लाख ३ हजार ३१८ बनावट नोटा सापडल्या. यात रुपये १०, २०, ५०, १००, ५०० व १००० रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश आहे. यात ५०० रुपयांच्या सर्वात जास्त बनावट नोटा आढळून आल्या. यांची संख्या १७ लाख ५७ हजार ४३४ इतकी असून मूल्य ८७ कोटी ८७ लाख १७ हजार इतके आहे. १००० रुपयांच्या ६ लाख १ हजार २६१ बनावट नोटा आढळून आल्या. यांचे मूल्य ६१ कोटी ६२ लाख ६१ हजार इतके आहे.