दक्षिण एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ३४० बॉटल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 09:18 PM2018-07-21T21:18:12+5:302018-07-21T21:19:02+5:30
दक्षिण एक्स्प्रेसने चंद्रपूरला नेण्यात येणाऱ्या दारूच्या ३४० बॉटल रेल्वे सुरक्षा दलाने जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या आहेत. दरम्यान यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण एक्स्प्रेसने चंद्रपूरला नेण्यात येणाऱ्या दारूच्या ३४० बॉटल रेल्वे सुरक्षा दलाने जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या आहेत. दरम्यान यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी गुन्हे रोखण्यासाठी तैनात केलेल्या चमूतील उपनिरीक्षक एस. पी. सिंह, संजय खंडारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक बी. डी. इप्पर, डी. डी. वानखेडे, किशोर चौधरी यांनी शुक्रवारी रात्री ८.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर आलेल्या १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसची तपासणी केली. यावेळी त्यांना कोच क्रमांक एस ५ मध्ये बर्थखाली एक बॅग बेवारस स्थितीत आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली असता कुणीच त्यावर आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात २२१०० रुपये किमतीच्या दारूच्या ३४० बॉटल आढळल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आली.