विशेष रेल्वेगाड्यांमधून ३४० प्रवासी नागपुरात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 07:48 PM2020-05-13T19:48:35+5:302020-05-13T19:55:30+5:30
रेल्वेने जागोजागी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. बुधवारी तीन विशेष रेल्वेगाड्या नागपुरात दाखल झाल्या. यात ३३० प्रवासी बिलासपूर, नवी दिल्ली आणि बंगळूरूला रवाना झाले तर ३४० प्रवासी विविध ठिकाणावरून नागपुरात दाखल झाले. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेने जागोजागी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. बुधवारी तीन विशेष रेल्वेगाड्या नागपुरात दाखल झाल्या. यात ३३० प्रवासी बिलासपूर, नवी दिल्ली आणि बंगळूरूला रवाना झाले तर ३४० प्रवासी विविध ठिकाणावरून नागपुरात दाखल झाले. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
नागपूर रेल्वेस्थानकावर बुधवारी तीन विशेष रेल्वेगाड्या दाखल झाल्या. सकाळी ५.५० वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०२४४२ नवी दिल्ली-बिलासपूर ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या गाडीतून १९० प्रवासी बिलासपूरकडे रवाना झाले तर १४२ प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. त्यानंतर सकाळी ११ वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०२४९२ नवी दिल्ली-बंगळूरू एक्स्प्रेस आली. या गाडीतून ३९ प्रवासी सिकंदराबादला रवाना झाले तर नागपूर रेल्वेस्थानकावर १२३ प्रवासी उतरले. प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या आत जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात आला. बाहेर पडताना आरपीएफ ठाण्याच्या शेजारील जिन्यावरून बाहेर सोडण्यात आले. बाहेरगावी जाणाऱ्या आणि नागपुरात उतरलेल्या प्रत्येक प्रवाशाची स्क्रिनिंग केल्यानंतरच त्यांना रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर सोडण्यात आले. विमानतळाप्रमाणे प्रवासाच्या एक तास आधीपर्यंत प्रवाशांना आत सोडण्यात आले. दुपारी ३.३६ वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०२६९१ बंगळूरू-नवी दिल्ली एक्स्प्रेस आली. या गाडीतून १०१ प्रवासी नवी दिल्लीकडे रवाना झाले तर ७५ प्रवासी खाली उतरले. प्रवाशांना त्यांच्या परिसरात सोडण्यासाठी महापालिकेच्या बसेस रेल्वेस्थानकावर हजर होत्या. अनेक प्रवाशांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले होते. बुधवारीही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर रोखण्यात आले. त्यामुळे अनेक प्रतिनिधी रेल्वेस्थानकावर येऊन आल्यापावली परत गेले.
३४० प्रवाशांना केले होम क्वारंटाईन
नागपूर रेल्वेस्थानकावर उतरलेल्या ३४० प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार या प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारल्यानंतर त्यांना रेल्वेस्थानकाच्या बाहेर सोडले. या प्रवाशांना १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केल्या.
प्रवाशांची झाली गैरसोय
रेल्वेस्थानकावर गाडीतून उतरलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली. परंतु तपासणी करताना ऐनवेळी तीन थर्मल स्क्रिनिंग मशीन बंद पडल्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसून रहावे लागले. यात रेल्वेने प्रत्येक प्रवाशाची माहिती, मोबाईल क्रमांक, पत्ता नोंदवून घेतल्यामुळेही प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडण्यासाठी एक तास वेळ लागला. किमान रेल्वे प्रशासनाने चांगल्या थर्मल स्क्रिनिंग मशीन उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
जिना उतरताना प्रवाशांना होतोय त्रास
रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकाच्या आत जाणाऱ्या प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देणे सुरु केले आहे तर बाहेर पडताना आरपीएफ ठाण्याच्या शेजारील जिन्यावरून उतरून प्रवाशांना बाहेर पडावे लागत आहे. यात सामान घेऊन ४० पायऱ्या उतरताना प्रवाशांची दमछाक होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना सामान घेऊन उतरताना तसेच महिलांना आपल्या मुलांना कडेवर घेऊन उतरताना मोठा त्रास होत आहे. आत जाताना प्रवाशांना एक तासापूर्वी आत सोडण्यात येत आहे. त्यामुळे बाहेर पडताना प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर जाऊ द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.