३४१ शाळांची वीज कापली
By admin | Published: February 6, 2016 02:57 AM2016-02-06T02:57:18+5:302016-02-06T02:57:18+5:30
प्रगत शैक्षणिक धोरणात डिजिटल शाळा, ई-लर्निंग, व्हर्च्युअल क्लासरूमसारख्या संकल्पना शिक्षण विभाग राबवीत आहे. या सर्व संकल्पना राबविणे विजेशिवाय शक्य नाही.
थकबाकीपोटी कापले कनेक्शन : प्रगत शैक्षणिक धोरणाचा फज्जा
नागपूर : प्रगत शैक्षणिक धोरणात डिजिटल शाळा, ई-लर्निंग, व्हर्च्युअल क्लासरूमसारख्या संकल्पना शिक्षण विभाग राबवीत आहे. या सर्व संकल्पना राबविणे विजेशिवाय शक्य नाही. असे असताना नागपूर जिल्हा परिषदेच्या ३४१ शाळांची वीज महावितरणने कापल्याने शाळा अंधारात बुडाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या प्रगत शैक्षणिक धोरणाचा ग्रामीण भागात फज्जा उडतो आहे.
३४१ शाळांमध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शाळांचा समावेश आहे.
वीज मीटरच काढून नेले
नागपूर : शाळांनी वीज बिल न भरल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शाळेचे वीज मीटरच काढून नेले. यात केंद्रीय मंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातील शाळेचाही समावेश आहे. शिक्षण विभागाने आॅनलाईनचे धोरण राबविले आहे. सरलसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी, शिक्षकांचा प्रगती अहवाल, शिक्षकांचे पगार आॅनलाईन करण्यात आले आहे. शाळाशाळांमध्ये संगणकाचा पुरवठा करण्यात आला आहे. परंतु वीज नसल्याने संगणक शोभेची वस्तू ठरत आहे. शाळांच्या देखभालीसाठी दिले जाणारे अनुदान अनेक वर्षांपासून बंद आहे. शाळा सुधार फंड गोळा करण्यास शासनाने मनाई केली आहे. सार्वजनिक हेतू असतानाही जिल्हा परिषदेच्या शाळांकडून व्यावसायिक दराने विजेची आकारणी महावितरण करीत आहे. मुख्याध्यापक आपल्या खिशातून विजेचे बिल भरतात. अनुदानच बंद असल्याने मुख्याध्यापकांनी वीज बिल भरण्यास इन्कार केला आहे. त्यामुळे थकीत वीज बिलापोटी महावितरणने शाळांचे वीज कनेक्शन कापले आहे. आजघडीला जिल्ह्यातील ३४१ शाळा अंधारात असल्या तरी भविष्यात अनेक शाळांवर हीच परिस्थिती येणार आहे. या संदर्भातील तक्रारी जि.प.च्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाही करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)