शंभर टक्के विद्युतीकरणामुळे रेल्वेची वर्षाला ३४२ कोटींची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2023 10:29 PM2023-03-06T22:29:27+5:302023-03-06T22:34:40+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे. त्यामुळे आता विभागातून जाणाऱ्या सर्व गाड्या वीजेवर धावणार आहेत. परिणामी रेल्वेची वर्षाला अंदाजे ३४२ कोटीं रुपयांची बचत होईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी दिली.
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे. त्यामुळे आता विभागातून जाणाऱ्या सर्व गाड्या वीजेवर धावणार आहेत. परिणामी रेल्वेची वर्षाला अंदाजे ३४२ कोटीं रुपयांची बचत होईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी दिली.
सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना प्रसाद म्हणाले की, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ९७० रूट किमी आणि २,३३२ ट्रॅक किमीचे ब्रॉडगेज मार्ग आहेत. विभागाची एकूण स्थापित ट्रॅक्शन वीज पुरवठा क्षमता ७५४ (एमव्हीए) आहे. ज्यात १७ ट्रॅक्शन सब स्टेशनचा समावेश आहे. इटारसी - नागपूर, नागपूर - बडनेरा, सेवाग्राम - बल्लारशाह, आमला - छिंदवाडा, नरखेड - चांदूर बाजार आणि वणी - पिंपळखुटी सेक्शनमधील विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. वणी - पिंपळखुटी दरम्यान सुमारे ६७ रूट किमीच्या अंतिम टप्प्याचे विद्युतीकरणानंतर नागपूर विभागाचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
या विद्युतीकरणातून रेल्वेने वाहतुकीची पर्यावरणपूरक पद्धत निश्चित केली. त्यामुळे आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी झाले असून देशाच्या परकीय चलनाचीही बचत होणार आहे. याशिवाय ट्रॅक्शन बदलांमुळे होणारा अडथळा टळून क्षमताही वाढली आहे. या एकूणच स्थितीमुळे वार्षिक इंधन बिलात सुमारे ३४२ कोटींची बचत होणार आहे. त्याबरोबरच वार्षिक सुमारे १.०५ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होणार असल्याचे साैरभ प्रसाद यांनी सांगितले.
२०३० पूर्वी “नेट झिरो कार्बन एमिटर” बनण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेची वाटचाल सुरू असून रेल्वेला पर्यावरणपूरक, कार्यक्षम, किफायतशीर, वक्तशीर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले. यावेळी अपर रेल्वे व्यवस्थापक पी. एस. खैरकर, रुपेश चांदेकर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णनाथ पाटील, विद्युत अभियंता अमित गुप्ता, राजेश चिखले, विजय थूल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
वर्ल्ड क्लासच्या कामासाठी समन्वयावर भर
नागपूर आणि अजनी रेल्वेस्थानकाचा पुनर्विकासाचे (वर्ल्ड क्लास स्टेशन) काम ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी रेल्वे भूमी विकास प्राधिकरण, मध्य रेल्वे, बांधकाम विभाग आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयावर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक आठवड्यात त्यासाठी बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे.
अजनीच्या केबल पुलाला लवकरच मंजूरी
महापालिका आणि महारेल्वे तर्फे अजनीत बनविण्यात येणाऱ्या केबल आधारित पुलाच्या ड्राईंगला मध्य रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागाकडून लवकरच मंजुरी प्रदान केली जाणार असल्याचे प्रसाद यांनी यावेळी सांगितले.
प्रवाशांना त्रास होणार नाही
नागपूर - मुंबई दुरंतो एक्सप्रेसच्या स्लिपर कोचची संख्या कमी करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे प्रसाद म्हणाले.
------